कोट्यवधी रुपयांच्या एमडी ड्रग्स प्रकरणात वॉन्टेड असलेल्या ‘नीलोफर’ला अटक; ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
आता बांद्रा पश्चिममध्ये खुलेआम ड्रग विक्री करणाऱ्या ‘रुबिना’च्या अटकेची मुंबई पोलिसांकडून प्रतीक्षा
मुंबई – ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने अखेर बांद्रातील कुख्यात ड्रग्स माफिया नीलोफर हिला कोट्यवधी रुपयांच्या एमडी ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. मात्र, नीलोफरच्या अटकेनंतरही तिची साथीदार रुबिना बांद्रापश्चिम मधील दरगाह गल्ली, म्हाडा ग्राउंड परिसरात तिच्या वर्कर्समार्फत उघडपणे एमडी ड्रग्स विक्री खुलेआम, दिवसाढवळ्या सुरू आहे. नीलोफर आणि रुबिना या दोघींवर आधीच नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून गुन्हे दाखल आहेत आणि त्या अनेक प्रकरणांमध्ये जामिनावर बाहेर आहेत. १२ फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या ठाकुरपाडा येथील चेतन अपार्टमेंटमधील रूम नंबर २०२ मध्ये ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ अधिकारी राहुल मस्के यांच्या पथकाने छापा टाकून इलियास खान, अमन खान आणि सैफ अली खान यांना अडीच किलो एमडी ड्रग्ससह (किंमत सुमारे २ कोटी ५० लाख रुपये) अटक केली होती. हे ड्रग्स राजस्थानहून आणले गेले होते. ज्या खोलीवर छापा टाकण्यात आला, ती खोली नीलोफरची होती आणि सैफ अली खान तिचा नातेवाईक आहे. याच खोलीत नीलोफर व रुबिना ड्रग्स मिक्स करून लहान पॅकेट्स तयार करून संपूर्ण मुंबईत पुरवठा करायच्या. छाप्यावेळी नीलोफर तिथे नव्हती आणि तेव्हापासून ती फरार होती.
एक पोलीस अधिकारी सांगतात, “नीलोफर सतत आपले ठिकाण बदलत होती. कधी अजमेर, कधी इतरत्र. ती दिवसातून फक्त ५ मिनिटांसाठी मोबाईल ऑन करत होती आणि मग बंद करत होती. पण आमच्या टीमने हार मानली नाही आणि अखेर तिला मुंबईच्या विक्रोळी परिसरातून अटक करण्यात आली.” नीलोफरला अटक केल्यानंतर ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आणि तिला २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता नीलोफरने न्यायालयात दावा केला आहे की तिला कॅन्सर आहे आणि तिचे उपचार टाटा हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. मात्र पोलिसांना शंका आहे की ही केवळ जामिनासाठीची एक क्लृप्ती असू शकते. टाटा हॉस्पिटलची फाईल खरी आहे की खोटी, याची चौकशी सुरू आहे. नीलोफरला ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के व त्यांच्या पथकाने खूप प्रयत्नांनंतर अटक केली आहे. तरीसुद्धा रुबिना अजूनही बांद्रा पश्चिम येथील दरगाह गल्ली, म्हाडा ग्राउंड भागात एमडी ड्रग्सचा व्यवसाय चालवत आहे. जर बांद्रा पोलीस व जुहूची अँटी टेररिस्ट स्क्वॉड याकडे लक्ष देईल, तर रुबिना व तिच्या वर्कर्सना अटक करणे शक्य आहे. दररोज हजारो कॉलेज विद्यार्थी व तरुण एमडी ड्रग्स घेत आहेत, ज्यामुळे मुंबईतील गुन्हेगारी वाढत आहे. आमची फक्त एवढीच मागणी आहे की, पोलीस रुबिनाच्या एमडी ड्रग्स नेटवर्कला कायमचं संपवावं आणि बांद्राला ड्रग्समुक्त करावं.