आमचे पुनर्वसन करा आणि कायम स्वरुपी घरं द्या, अशी मागणी करत कल्याण इमारत दुर्घटनेनंतर ५० कुटुंब रस्त्यावर
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण पूर्वेतील चिकणी पाडा येथील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. सहा जण जखमी झाले. या इमारत राहणाऱ्या ५० कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले. त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था नुतन विद्यामंदिर शाळेत केली आहे. या सर्व रहिवाश्यांनी गुरुवारी २२ मे रोजी नुतन विद्यामंदीर शाळेपासून पायी चालत कल्याण डोंबिवली मुख्यालयात धाव घेतली. आमचा उद्धवस्त झालेला संसार कसा उभा करायचा असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. आमचे पुनर्वसन करा आणि कायम स्वरुपी घरं द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. सप्तशृंगी या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या सचिव रेखा पाठारे यांनी सांगितले की, ‘हा आमचा मोर्चा नाही. आम्ही महापालिकेस निवेदन द्यायला आलो आहोत. आमची तात्पुरती राहण्याची व्यवस्था नूतन विद्यामंदिर शाळेत केली. आता जून महिन्यात शाळा सुरु होणार आहे. शाळा प्रशासनालाही पावसाळ्यापूर्वी शाळेची डागडुजी करावी लागले. त्यामुळे रहिवासी फार काळ त्या शाळेत राहू शकत नाहीत. सर्व रहिवाश्यांची कायम स्वरुपी सोय करा. आमचे पुनर्वसन करा आम्हाला कायमस्वरुपी घर घा, अशी मागणी त्यांनी केली.
घटना ज्या दिवशी घडली तेव्हा आम्हाला १५ मिनिटांमध्ये घरातील पैसा, दागिने, कागदपत्रे काढण्यासाठी वेळ दिला होता. अनेक वर्षाचा मांडलेला संसार १५ मिनिटांमध्ये कसा बाहेर काढणार.? आमचा उद्धवस्त झालेला संसार आम्ही कसा उभा करायचा? हा आमचा सवाल आहे. आमच्या घरातील लोक मृत्यूमुखी पडले. त्याला तीन दिवस झालेले नाहीत. तोच आम्ही घराबाहेर पडून रस्त्याने चालत महापालिका गाठली आहे. हे सांगताना पाठारे यांना रडू कोसळले. पाठारे यांनी सांगितले की, सरकारने मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे. ती रक्कम मृतांच्या कुटुंबियांच्या हाती लवकर मिळावी. तसेच जे जखमी रहिवाशी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या उपचार खर्चासाठी सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी आमची मागणी आहे.