खेडमधील जगबुडी नदी बनली काळ; पुलावरून कार १०० फूट खाली कोसळून ५ जणांचा दुर्दैवी अंत
पोलीस महानगर नेटवर्क
खेड – जिल्ह्यातील खेड येथे झालेल्या अपघातात पाचजणांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर हा अपघात झाला. येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट १०० फूट खाली कोसळली. यामध्ये कारमधील पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. या कारमधील सर्वजण मुंबईतून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्घटनेत कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहेत.
पुढे आलेल्या माहितीनुसार, पहाटे साधारण पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कार जगबुडी नदीवरुन जात असताना भरधाव वेगात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती १०० ते १५० फूट खाली कोसळली. कार जोरात खाली आदळल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे. ही कार क्रेनच्या साहाय्याने वर उचलण्यात आली. त्यानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले. या भीषण दुर्घटनेत कारचा चालक आणि एक प्रवासी गंभीररित्या जखमी झाला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे.