आयएस दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना मुंबई विमानतळावर अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन दहशतवाद्यांना अटक केली. अब्दुल्ला फैयाझ शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेचे पुण्यातील हस्तक असून, आयईडी स्फोटके निर्मितीप्रकरणातील आरोपी आहेत. पुण्यातील कोंढव्यात ‘आयएस’चे दहा ‘स्लीपर सेल’ दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते. भारतात हिंसाचार व दहशतवादाद्वारे इस्लामी राज्य आणून देशाची शांत व सामाजिक एकात्मता बिघडविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्याअंतर्गत आयईडी स्फोटके तयार करून, त्यांच्या चाचणीचे काम कोंढवा येथे सुरू होते. त्यातील आठ जणांना याआधीच अटक करण्यात आली. मात्र, अब्दुल्ला फैयाझ शेख ऊर्फ डायपरवाला व तल्हा खान हे दोघे दोन वर्षांपासून तपास संस्थांना गुंगारा देत होते.
आयईडी स्फोटकांची चाचणी अब्दुल्ला शेखच्या घरी सुरू होती. या दोघांचा एनआयएकडून शोध सुरू होता. हे दोघे दोन वर्षांनंतर इंडोनेशियाहून मुंबई विमानतळाच्या टर्मिनल दोनवर आले असता, इमिग्रेशन विभागाने त्यांना रोखले. त्यानंतर एनआयएने त्यांना अटक केली. दोघेही विविध कलमांखालील आरोपपत्रातील आरोपी आहेत. यामधील अन्य आरोपींमध्ये महंमद इम्रान खान, महंमद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसिरुद्दीन काझी, झुल्फीकार अली बारुदवाला, शमिल नाचन, आकिफ नाचन व शहनवाझ आलम यांचा समावेश आहे.
अब्दुल्ला शेख याने पुण्यातील कोंढवा भागात भाड्याने घेतलेल्या घरात हे दोघे आयईडी तयार करीत होते. २०२२-२३ या काळात त्यांनी स्फोटक तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिरही घेतले होते आणि एक नियंत्रित स्फोट करून चाचणी घेतली होती. या प्रकरणात एनआयएने याआधीच १० आरोपींविरुद्ध एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. महंमद इमरान खान, महंमद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नासिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोदावाला, शमिल नाचन, अकिफ नाचन आणि शहनवाज आलम, अशी अन्य अटक आरोपींची नावे आहेत.