भिंतींमध्ये ४५ लाखांची रोकड, ईडी च्या धाडीत बांधकाम माफियाचा प्रताप; सीताराम गुप्ता याला अटक

Spread the love

भिंतींमध्ये ४५ लाखांची रोकड, ईडी च्या धाडीत बांधकाम माफियाचा प्रताप; सीताराम गुप्ता याला अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

नालासोपारा – नालासोपाऱ्यातील ४१ अनधिकृत बांधकामांप्रकरणात ईडीने १३ ठिकाणी छापा टाकला आहे. सीताराम गुप्ता याच्या नालासोपारा पूर्वच्या संतोष भवन परिसरातील घरावर टाकलेल्या छाप्यात ४५ लाख रुपयांची रोकड आणि महत्त्वाचे दस्तावेज सापडले आहेत. विशेष म्हणजे सीताराम गुप्ता याने घरातील भिंतीमध्ये बनवलेल्या गुप्त कपाटात ठेवलेल्या तिजोरीत ४५ लाख रुपयांची रोकड सापडली आहे. याच प्रकरणी सीताराम गुप्तावर यापूर्वी २०२३ साली आर्थिक गुन्हे शाखेने देखील कारवाई करून त्याला अटक केली होती. ईडीकडून वसई-विरारसह हैदराबादमध्ये छापे टाकण्यात आले होते. या कारवाईत ईडीने वसई विरार महापालिकेचे नगर रचना उपसंचालक व्हाय एस रेड्डी याच्या हैदराबाद येथील निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात सुमारे ३३ कोटी रुपये किमतीचे रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे हिरे जडित दागिने सापडले होते.

नालासोपारा पूर्वेकडील वसंत नगरीतील डंपिंग ग्राऊंड आणि एसटीपी प्लॉटसाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. या जागेवर बहुजन विकास आघाडीचे तत्कालीन नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी या जागेचा ताबा घेऊन काही बिल्डरांना ती विकली होती. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांच्या संगनमताने या जागेवर ४१ अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या होत्या. नालासोपारा परिसराती ४१ अनधिकृत बांधकामे नोव्हेंबर २०२४ मध्ये महापालिकेने तोडली होती. याप्रकरणी तपासणीत रहिवाशांना इमारत अनधिकृत असल्याची कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे २५०० कुटुंबे रस्त्यावर आली होती. याप्रकरणी ईडी अधिक तपास करीत असून, ईडीने वसई – विरार परिसरात बेकायदेशीर ४१ इमारतींच्या बांधकामांप्रकरणी मोठी कारवाई हाती घेतली आहे. मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयामार्फत दाखल करण्यात आलेल्या विविध गुन्ह्यांच्या आधारे ईडीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon