लग्नाच्या एकदिवस आधी कांग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता; अमरावती पोलिसात तक्रार दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
अमरावती – अमरावती जिल्ह्यातून खळबळजनक बातमी समोर आलीये. उद्या ज्या मुलाचं लग्न होतं, तो मुलगा मंगळवारी बेपत्ता झाला. विशेष म्हणजे हा मुलगा अमरावतीतील काँग्रेस नेत्याचा आहे. या प्रकरणी वडील असलेल्या काँग्रेस नेत्याकडून अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा लग्नाच्या एकदिवस आधी बेपत्ता झालाय. वैभव मोहोड (३०) असं बेपत्ता झालेल्या तरुणाच नाव आहे. याप्रकरणी वैभव मोहोड याचे वडील हरिभाऊ मोहोड यांनी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
वैभव हा काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा आहे. वैभव शिवाजी महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होता. मंगळवारी सकाळी सामान आणायला बाहेर जातो, असं सांगून गेलेला वैभव घरी परत न आल्याने वडिलांकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेपत्ता झालेल्या वैभव याने मंगळवारी सकाळीच एटीएममधून ४० हजार रुपये काढल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फ्रेजरपुरा पोलीस करत आहेत. पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आहे. हरिभाऊ मोडक हे काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध पदांवर काम केले होते. हरिभाऊ मोहोड हे जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी देखील करण्यात आली होती. हरिभाऊ मोहोड हे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अभ्यासू नेते म्हणून हरिभाऊ मोहोड यांची ओळख आहे. दरम्यान, ऐन लग्नाच्या एक दिवस अगोदर मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलिसांनी वैभव मोहोड यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.