अकोल्यात नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; शहरात खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
अकोला – सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली असून उद्योग, व्यवसाय असो किंवा शिक्षण असो स्पर्धेच्या युगात टीकण्यासाठी स्पर्धेत जोमाने उतरावे लागते. शिक्षण क्षेत्रात शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठीही स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्यातून, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासाठीचा तणाव वाढल्याने ते टोकाचं पाऊल उचलत असल्याचं दिसून येते. नुकताच १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यावेळी २ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता, अकोल्यात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या २ विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी जीवन संपवल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मात्र, दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत. अकोल्यात नीट अभ्यासक्रमाचा सराव करणाऱ्या २ विद्यार्थ्यानी केली आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. येथील १७ वर्षीय पार्थ गणेश नेमाडे आणि १८ वर्षीय अर्णव नागेश देबाजे अशी आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याची नावे आहेत. पार्थ नेमाडे हा तेल्हारा तालूक्यातील रायखेड येथील रहिवासी असून तो अकोल्यातील न्यू अकॅडमी येथे शिकवणी वर्षात शिक्षण घेत होता. तर अर्णव देबाजे हा अकोल्यातल्या मोठी उमरी भागातील रहिवासी असून त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय, दोघेही विद्यार्थी नीट अभ्यासक्रमाचा सराव करीत होते. दोन्ही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनेने अकोल्यात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.