साताऱ्यात वाईन शॉप लायसन्ससाठी सव्वा कोटीची फसवणूक, तिघांना पोलिसांकडून बेडया
पोलीस महानगर नेटवर्क
सातारा – राज्यात अलीकडच्या काळात वाईन शॉप, देशी व बिअर शॉप च्या अनुज्ञाप्तीसाठी बऱ्याच वेळा फसवणूक केली जाते. राज्यात असे अनेक भामटे वाईन शॉप व देशी दारूच्या दुकानाचे लायसन्स काढून देतो सांगून करोडो रुपयांची फसवणूक करतात. अशा फसवणूक करणाऱ्या लोकांवर वेळीच कारवाई झाल्यास पायबंद होईल अशी प्रतिक्रिया फसवणूक झालेल्या अनेकांनी दैनिक ‘पोलीस महानगर’ शी बोलताना व्यक्त केली आहे. सातारा मध्ये वाईन शॉपचे लायसन्स मिळवून देण्याच्या नावाखाली तिघांनी एका कॉन्ट्रॅक्टरची १ कोटी २६ लाख ६७ हजार ५०० रूपयांची फसवणूक केली आहे. शर्मिला विजयकुमार खंदारे (४०) रा.सदरबझार सातारा) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी खंदारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुधीर विठ्ठल राऊत (रा. पुणे), रुपेश राजाराम वंजारी, (रा. कृष्णानगर, सातारा) डॉ. शरद दत्तात्रय कुंभार, ( वडूज, ता. खटाव) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्ट्रक्टर शर्मिला खंदारे यांना वाईन शॉपचे लायन्सन पाहिजे होते. हे लायसन्स मिळवून देण्यासाठी सुधीर राऊत, रुपेश वंजारी, डॉ. शरद कुंभार यांनी मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून विश्वासात घेतले. त्यानंतर लायसन्स मिळवून देण्यासाठी कागदपत्रे घेतली. काही दिवसांनी महाराष्ट्र शासनाचे राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचा शिक्का, भारतीय राजमुद्रा असलेले बनावट लायसन्स शर्मिला खंदारे यांना दिले. या लायसन्सच्या नावाखाली वेळोवेळी त्यांच्याकडून बॅँकेत व रोख स्वरुपात १ कोटी २६ लाख ६७ हजार ५०० रुपये घेतले. या लायसन्सबाबत शर्मिला खंदारे यांनी चौकशी केली असता त्यांना हे लायसन्स बनावट असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे शर्मिला खंदारे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी उपनिरीक्षक जायपत्रे यांनी सुधीर राऊत व डॉ. शरद कुंभार यांना अटक केली आहे तर तिसरा आरोपी रुपेश वंजारी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.