वाशी येथील स्पा मध्ये काम करणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार, वर्तकनगर पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – नवी मुंबईतील वाशी परिसरात असलेल्या फिनिक्स स्पा मध्ये काम करणाऱ्या मुलीवर ठाण्यातील हॉटेलमध्ये दोघांनी बलात्कार केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. ०३६२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ७०(१),७४,७९ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सिराज चौधरी (५५) व यश (२४) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी ही मुंबईतील चेंबूर परिसरात वास्तव्यास असून नवी मुंबई येथील वाशी परिसरात असलेल्या फिनिक्स स्पा मध्ये काम करीत आहे. त्या ठिकाणी तिच्या मैत्रिणीच्या ओळखीचे सिराज चौधरी याने ठाणे येथील एका हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती. सदर पार्टीमध्ये पीडित मुलगी व तिच्या दोन मैत्रिणी सुद्धा उपस्थित होत्या. त्या ठिकाणी सिराज चौधरी व यश या दोघांनी मिळून पीडित मुलीला जबरदस्तीने दारू पाजली व हॉटेलमध्ये घेऊन गेले. त्याठिकाणी सिराज चौधरी व यश या दोघांनी मिळून पीडित मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला व कुठे याची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पीडित मुलगी त्या दोन नराधमांच्या तावडीतून सुटल्यावर त्या दोघांनी पीडित मुलीच्या मैत्रिणीला सुद्धा मनाला लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारे लगट करण्याचा प्रयत्न केला. त्या नंतर पीडित मुलगी व तिची मैत्रीण ओला टॉक्सिने वाशी येथील दुसऱ्या हॉटेलमध्ये गेल्या व दुसऱ्या दिवशी वर्तकनगर पोलीस ठाण्यात येऊन सर्व हकीकत पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन्ही आरोपींच्या मुसक्या वाशी येथील एका हॉटेलमध्ये घुसून आवळल्या. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.