पुण्यात बनावट नोटांचा धंदा करणारी महिलांटोळीचा पर्दाफाश, इंजिनिअरिंगच्या मुलांना हाताशी धरून घातला लाखोंचा गंडा
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यात गुन्हेगारी मोठया प्रमाणात वाढलेली असून कायद्याचा धाक उरलेला दिसून येत नाही. बनावट नोटांच्या धंद्यात यापूर्वी पुरुष सक्रिय असल्याचे सातत्याने दिसून आले आहे, मात्र आता पुण्यात महिलांची टोळी देखीक सक्रिय असल्याने त्याचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पथकानं बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे. संबंधित आरोपी पुण्यात बनावट नोटांचा होलसेल धंदा करत होते. १ लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात आरोपी दोन लाखांच्या बनावट नोटा विकत होते. या नोटा इतक्या हुबेहूब होत्या की बँक कर्मचाऱ्यांना देखील या बनावट असल्याचं समजत नव्हतं. पण शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पोलिसांना या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून नोट छपाईच्या प्रिंटर, शाई, कोऱ्या कागदासह २८ लाख ६६ हजार रुपये किमतीच्या बनावट आणि दोन लाखांच्या खऱ्या नोटा जप्त केल्या आहेत. या टोळीचे परराज्यातही धागेदोरे असून, रॅकेटमध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मनीषा ठाणेकर (वय ३५, रा. येरवडा), सचिन यमगर (३५, रा. गहुंजे), नरेश शेट्टी (४२, रा. लोहगाव), भारती गावंड (३४) आणि प्रभू गुगलजेड्डी (३८, दोघेही रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. परिमंडळ – १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. संबंधित टोळी एक लाख रुपये घेऊन दोन लाखांच्या बनावट नोटा देत असल्याची माहिती तपासात उघड झाली. या टोळीत सामील असलेल्या अन्य आरोपींच्याही मागावर पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १७ एप्रिल २०२५ रोजी पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील एका नामांकित बँकेत सीडीएममधून दोनशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा जमा केल्या होत्या. या नोटा इतक्या हुबेहूब होत्या की मशीनला देखील त्या बनावट असल्याचं समजू शकलं नाही. ज्यावेळी ही बाब बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी संबंधित रक्कम कोणत्या खात्यात जमा केली, याचा तपशील काढला. त्यावेळी एका इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचं दिसून आलं. पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याकडे चौकशी केली असता, ते पैसे दुसऱ्या एका विद्यार्थ्यानं दिल्याचं समजलं. तो विद्यार्थी देखील इंजिनिअरींगला शिकत होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याची आई मनीषा ठाणेकरनं या नोटा दिल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी ठाणेकरला चौकशीसाठी बोलावून घेत अटक केली. ठाणेकरची चौकशी केली असता या रॅकेटमध्ये इतर पाच जणांचा देखील सहभाग असल्याचं समोर आलं. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यातलं बनावट नोटांचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.