आम्हीच इथले भाई ! हॉर्न वाजविल्याच्या वादातून भाऊ-बहिणीला बेदम मारहाण; एकाला अटक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. कायद्याचा धाक व वचक गुन्हेगारांवर राहिलेला नाही. अशीच घटना घडली आहे. हॉर्न वाजविल्याच्या वादातून आम्ही इथले भाई म्हणत टोळक्याने भाऊ बहिणीला बेदम मारहाण करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. टोळक्याने तरुणाच्या डोक्यात दगड घातला असून या घटनेत तिघे जण जखमी झाले आहेत. याबाबत करण ललित केसवाणी (वय २८, रा. जीवन ज्योती, गुरुनानकनगर, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शोएब उमर सय्यद (वय २९, रा. कासेवाडी, भवानी पेठ) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ५ ते ६ साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत करण केसवाणी, हर्ष केसवाणी, निकिता केसवाणी हे जखमी झाले आहेत. हा प्रकार भवानी पेठेतील गुरुनानकनगरमधील जीवन ज्योती सोसायटीत रविवारी दुपारी २ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण याचा भाऊ हर्ष रविवारी भवानी पेठेतील गुरुनानकनगर येथून दुचाकीवर जात होता. यावेळी हर्ष याने हॉर्न वाजविल्याने शोएब सय्यद याने त्याच्याशी वाद घातला. शिवीगाळ करुन त्याच्या कानाखाली हाताने मारहाण केली. त्याचे कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. हर्ष, त्याचे आजोबा भारत केसवाणी, बहिणी निकिता केसवाणी हे जाब विचारण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी रस्ता ब्लॉक करुन करण यांना शिवीगाळ करत, “हमको पुछनेवाला तु कौन है बे, इधर के हम सब भाई है, यहा पै सिर्फ हमारी चलती है, रुक अब तुम सबको दिखाता, तेरे भाई को जान से मार डालता,” असे म्हणून शोएबने रस्त्यावरील दगड घेऊन हर्षला जीवे ठार मारण्याच्या इराद्याने जोरात हर्षच्या डोक्यात दगड घातला.
हर्षच्या डोक्यातून रक्त येत असतानाही तो त्याला मारहाण करत राहिला. शोएबचे साथीदार तेथे आले. त्यांनीही करण व हर्ष यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर दगड फेकू लागले. दगड लागल्याने निकिताच्या हाताला व पायाला दुखापत झाली. शोएब याने आजोबा भारत केसवाणी यांना शिवीगाळ करुन त्यांचे घर जाळुन टाकण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी शोएब उमर सय्यद याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे तपास करीत आहेत.