सावत्र लेकीवर अत्याचार व बायकोची हत्या करुन फरार झालेल्या आरोपीला २१ वर्षानंतर विरार पोलीसांनी ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
विरार – मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा २ च्या युनिटने २१ वर्षांपासून फरार असलेल्या खुनी आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अखेर अटक केली आहे. आरोपी साजिद उर्फ परवेज शेख (५५ ) याने २००४ साली आपल्या सावत्र मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिच्या आईला ठार मारले होते. त्यानंतर, आरोपी तब्बल २१ वर्षांपासून स्वत:ची ओळख लपवून फिरत होता. मात्र, कानून के हात लंबे होते है.. हे विरार पोलिसांनी दाखवून दिलं. फरार बलात्कारी व खुनी आरोपीला २१ वर्षानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. २० मे २००४ रोजी, विरार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०१/२००४ भादंवि कलम ३०२, ३७६, ५०४ अन्वये नोंद करण्यात आला होता. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, तिच्या सावत्र पित्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते, ज्यामुळे ती गरोदर राहिली. याची माहिती तिच्या आईला मिळताच, तिने आरोपीला जाब विचारला. याचा राग मनात धरून साजिद अली शेख याने तिला बेदम मारहाण करून, जमिनीवर आपटून तिचा खून केला. त्या घटनेनंतर आरोरी फरार झाला होता. तब्बल २१ वर्षे स्वतःची ओळख लपवत, तो परवेज आशिक अली या नावाने धारावीत राहत होता. पोलीस तपासात तो कुठेही सापडत नव्हता. मात्र, अखेर २१ वर्षांनी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गुन्हे शाखा २ च्या युनिटने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातम्यांच्या आधारे साजिद याचा ठावठिकाणा शोधून काढला. धारावी, जामा मस्जिद जवळ, चमडा बाजार येथे तो वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखा २ च्या युनिटने सापळा रचून त्याला अटक केली. सध्या आरोपीला पुढील कारवाईसाठी विरार पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, अधिक तपास सुरू असल्याची माहीत गुन्हे शाखा २ च्या युनिटने वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांनी दिली. पुढील अधिक तपास सुरू आहे.