वडाळ्यात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत जोरदार राडा, पोलीस विहिंपचे कार्यकर्ते आमनेसामने
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे, वडाळ्यात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये जोरदार राडा झाला. पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. रॅलीदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. विनापरवानगी रॅली काढण्यात आल्यानं हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे, पोलिसांनी विहिंपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलं आहे. रामनवमीनिमित्त विश्व हिंदू परिषदेकडून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील विश्व हिंदू परिषदेकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे जोरदार राडा झाला, पोलीस आणि विहिंपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप देखील कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे, या घटनेत काहीजण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान विनापरवानगी रॅली काढल्यामुळे काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणलं, त्यानंतर विहिंपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली तसेच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी आम्हाला मारलं, बांबुच्या काठीनं आम्हाला मारण्यात आलं. हे असंच सुरू राहिलं तर सर्व संपून जाईल. आम्ही यात्रेची तयारी करत होतो. पण पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारली. आम्ही त्यांना म्हटलं रॅलीचा वेळ सांयकाळी चार वाजेचा आहे, आम्हाला परवानगी द्या.
मात्र तिथे जेवढे कार्यकर्ते उपस्थित होते, त्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेराव घातला. आम्ही सर्वजण शांत होतो, आम्ही फक्त घोषणा देत होतो. पोलिसांनी सांगितलं आत चला आम्ही आत देखील निघालो होते, मग त्यांनी लाठीचार्ज का केला? असा सवाल यावेळी या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.