नांदेड जिल्हयात ५५ वर्षीय उपसरपंचच्या अनैतिक संबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; प्रसुती नंतर नवजात अर्भकाचीही विक्री
योगेश पांडे / वार्ताहर
नांदेड – नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील तामसा पोलीसठाण्याच्या हद्दीत एका गावातील अल्पवयीन मुलगी अनैतिक संबंधातून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या महिन्यात नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात तिची प्रसूती झाली. हे प्रकरण दाबण्यासाठी नवजात अर्भक विकण्यात आल्याची चर्चा आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तामसा पोलिसानी ५५ वर्षीय बाबुराव तुपेकर याला अटक केली. आरोपी हा उपसरपंच आहे. त्याच गावातील १६ वर्षीय मुलीवर आरोपी बाबुराव तुपेकर याने वर्षभरापूर्वी पाण्यात दारू आणि गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले होते. यानंतरही तो सातत्याने तिच्यावर अत्याचार करीत होता. अशी तक्रार पीडित मुलीने दिली आहे. त्यावरून तामसा पोलिसानी उपसरपंचाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अवैध संबंधातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली होती. मागील महिन्यात नांदेड शहरातील शासकिय रुग्णालयात तिची प्रसूती झाली. तिला मुलगी झाली. मात्र गावात बदनामी होईल म्हणून आरोपीने नवजात अर्भक विकल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत पोलिसांकडे अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. आरोपी बाबुराव तुपेकर याला अटक करण्यात आली आहे. नवजात अर्भकाची विक्री करण्यात आली होती का, तसंच प्रकरण मिटवण्यासाठी कोण कोण सहभागी होते याचा तपास पोलीस करत आहेत.