भाईजानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
गाडी बॉम्बनं उडवणार, घरात घुसून मारणार;वाहतूक विभागाच्या व्हॉट्सएप वर सुरक्षेच्या गराड्यात फिरणाऱ्या सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी.
योगेश पांडे – वार्ताहर
मुंबई – बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा धमकी आली आहे. सलमान खानला बॉम्बनं गाडी उडवून देण्याची धमकी आली आहे. मुंबईच्या वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सएप नंबरवर सलमानसंदर्भातला धमकीचा मेसेज आला. तसेच, याच मेसेजमध्ये सलमान खानला घरात घुसून मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, सलमान खान धमकी प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला येणाऱ्या धमक्यांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान गेल्या कित्येक वर्षांपासून बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आहे. यातच काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी आणि बॉलिवूड यांचे घनिष्ठ संबंध होते. सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगनं स्विकारली, त्यानंतर अख्खं बॉलिवूड हादरलं होतं. पुढे काही दिवसांतच सलमान खान, शाहरुख खान यांनाही धमक्या देण्यात आल्या.
बाबा सिद्दीकींच्या हत्येमागील बिष्णोई गँग कनेक्शन समोर आल्यानंतर तात्काळ सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली असून गेली कित्येक महिने सलमान खान कुठेही जाताना सुरक्षारक्षकांसोबतच मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दिसतो. सलमान खानच्या वांद्रे येथील घरालाही सुरक्षारक्षकांचा घेराव असल्याचं पाहायला मिळतो. तर, वांद्र्यातील गॅलेक्सीमधील घराच्या गॅलरीलाही बुलेटप्रुफ काचा लावण्यात आल्या आहेत. अशातच नेहमी कडेकोट सुरक्षेत फिरणाऱ्या सलमानची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.दरम्यान, वरळी पोलिसांच्या व्हॉट्सएप नंबरवर आलेल्या धमकीच्या मेसेजनं पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. सलमानची गाडी बॉम्बनं उडवून देण्यासोबतच त्याला त्याच्या घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे.