कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची तळोजा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची तळोजा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई – कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला. दुष्कृत्य केल्यानंतर तिचा मृतदेह फेकून दिला होता. या प्रकाराने समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. अवघ्या १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम आरोपी विशाल गवळी याने नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशाल गवळी याने तुरुंगातील कोठडीत गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजते. तळोजा कारागृहात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास विशाल गवळी याने शौचालयात जाऊन गळफास लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. विशाल गवळी याच्या आत्महत्येनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. निवृत्त न्यायाधीशांकडून याप्रकरणाची चौकशी सुरु असून लवकरच त्याचा अहवाल समोर येईल अशी माहिती मिळत आहे.

गुंड विशाल गवळी याने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून स्वत:च्या घरी आणले होते. घरात त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून विशालने घरातच या मुलीची हत्या केली होती. त्यानंतर विशाल गवळीने या मुलीचा मृतदेह बापगाव परिसरात फेकून दिला होता. त्यानंतर विशाल गवळी हा शेगावला पळून गेला होता. शेगाव पोलिसांनी सापळा रचत शिवाजी चौकातील एका सलूनमधून त्याला ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर कल्याण परिसरात संतप्त पडसाद उमटले होते. विशाल गवळी हा कल्याणमधील सराईत गुंड होता. त्याच्यावर बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होती. कल्याण पूर्व परिसरात त्याच्या दहशतीमुळे अनेक कुटुंब हा परिसर सोडून गेली होती. मात्र, विशाल गवळी याला राजकीय वरदहस्त असल्याने त्याच्याविरोधात कठोर कारवाई होत नव्हती. विशाल गवळीने अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिची हत्या केल्यानंतर मित्रासोबत जाऊन दारु विकत घेतली होती. त्यानंतर तो शेगावला पळून गेला होता.

गुंड विशाल गवळीची आतापर्यंत तीन लग्न झाली आहेत. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तर तिसरी बायको एका खाजगी बँकेत नोकरीला होती. विशाल गवळीने पहिल्या दोन बायकांप्रमाणे आपल्याला सोडून देऊ नये यासाठी पत्नीने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली होती. या दोघांनी एका रिक्षातून मृतदेह भिवंडीजवळील बापगाव परिसरात दोघांनी मिळून फेकून दिला होता. जैसे कर्म तैसे फळ अशी संतप्त प्रतिक्रिया कल्याणमधील नागरिक व्यक्त करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon