२ वर्षांच्या नातवासहीत गच्चीवरुन मारली उडी, आजीचा जागीच मृत्यू तर चिमुकल्याचा उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू

Spread the love

२ वर्षांच्या नातवासहीत गच्चीवरुन मारली उडी, आजीचा जागीच मृत्यू तर चिमुकल्याचा उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर 

रायगड – रायगडमधील रोह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका महिलेने तिच्या २ वर्षांच्या नातवासहीत इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. या घटनेनं रोह्यात एकच खळबळ उडाली असून या महिलेनं असं टोकाचं पाऊल का उचललं यामागील गूढ वाढलं आहे. ५२ वर्षीय महिलेने तिच्या अवघ्या २ वर्षांच्या नातवासह बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. या घटनेत उंचावरुन पडल्याने अती रक्तस्राव झाल्याने आजीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या २ वर्षांच्या नातवाला उपचारासाठी नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. रोहा-कोलाड रोड लगत असलेल्या ओम चेंबर इमारतीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

आत्महत्या करणाऱ्या महिलेची ओळख पटली असून तिचं नाव उर्मिला सिद्धाराम कोरे असं आहे. उर्मिला यांनी बुधवारी बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली.बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमार उर्मिला त्यांच्या नातवाला घेऊन गच्चीवर गेल्या आणि त्यांनी कोणताही पुढचा मागचा विचार न करता खाली उडी मारली. या घटनेत नातवाला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला जखमी अवस्थेतच पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेलं जात होतं. मात्र रुग्णालयात नेलं जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी आजीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. अधिकचा तपास रोहा पोलीस करीत आहेत. आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट असले तरी नातवाच्या आजाराला कंटाळून आजीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये आता पोलीस कोरे कुटुंबियांबरोबरच त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या आणि आत्महत्या करणाऱ्या उर्मिला यांच्या ओळखीतील लोकांकडे चौकशी करत आहेत. तसेच उर्मिला यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही सुसाईड नोट वगैरे ठेवली आहे का याचाही शोध घेतला जात असला तरी तसं काहीही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon