महसूल विभागातील नोकरीच्या अमिषाने फसवणूक, लिपिकासह दोघे अटकेत; बनावट नियुक्तीपत्र जप्त

Spread the love

महसूल विभागातील नोकरीच्या अमिषाने फसवणूक, लिपिकासह दोघे अटकेत; बनावट नियुक्तीपत्र जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – राज्यात एकीकडे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली असून त्याचाच फायदा घेत काही महाठग गरजू लोकांची फसवणूक करीत आहेत. अशीच एक घटना घडली आहे. महसूल, पोलीस आणि वनविभागात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करुन लाखो रुपये उकळणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपीने महसूल सचिव असल्याची बतावणी केली होती. आरोपीला बनावट नियुक्तीपत्रे देण्यासाठी पुण्यातील महसूल कार्यालयातील लिपिक सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. महादेव बाबुराव दराडे (वय ३२, सध्या रा. वाकड, मूळ. रा. धाराशिव) आणि रणजित लक्ष्मण चौरे (वय ३५, सध्या रा. धायरी. मूळ. रा. बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चौरे हा महसूल कार्यालयात सहायक लिपिकआहे. याबाबत एका तरूणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनूसार दराडे याच्याविरुद्ध दहा लाख रुपये घेवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,आरोपी दराडे जमीन खरेदी विक्रीचे काम करतो. कामानिमित्ताने शासकीय कार्यालयात त्याची ये-जा होती. त्याने अनेकांकडे महसूल सचिव असल्याची बतावणी केली होती. तरुणाचा एका परिचिताच्या माध्यमातून दराडे याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दराडेने तरूणाला पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती करतो, असे सांगून वेळोवेळी दहा लाख रूपये घेतले. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. दरम्यान पोलीस कर्मचारी उज्ज्वल माेकाशी यांना मिळालेल्या माहितीनूसार दराडे याला अटक करण्यात आली. त्याची मोटार, तसेच वाकड येथील घरातून पोलिसांनी बनावट कागदपत्रे जप्त केली. तेथून बनावट नियुक्तीपत्रे जप्त करण्यात आली. दराडे राज्यातील पंधरा ते वीस तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. दराडे याला चौरे हा बनावट नियुक्तीपत्र बनवून देण्यासाठी मदत करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी चौरे यालाही अटक केली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस कर्मचारी शंकर नेवसे, उज्ज्वल मोकाशी, पुष्पेंद्र चव्हाण, विनोद चव्हाण, राहुल शिंदे, नागेश राख यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली. याप्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon