वसईतील मुरार बाग परिसरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग; अग्निशमन दलाचा जवान व पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी

Spread the love

वसईतील मुरार बाग परिसरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग; अग्निशमन दलाचा जवान व पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी

योगेश पांडे / वार्ताहर 

वसई – वसई पूर्वेच्या नवघर समर्थ रामदास नगर मुरार बाग येथे घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. शॉट सर्किट झाल्याने ही आग लागली होती त्यातच सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठे नुकसान झाले आहेत.तर अग्निशमन दलाचा जवान व पोलीस कर्मचारी यात किरकोळ जखमी झाला आहे. वसईत एकापाठोपाठ एक आग दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. वसई पूर्वेच्या नवघर समर्थ नगर येथील मुरार बाग येथे खोली क्रमांक तीन मध्ये इरफान खान व त्यांचे कुटुंब राहते. बुधवारी घरात अचानकपणे शॉट सर्किट होऊन आग लागली होती. या आगीची माहिती तातडीने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान घरात असलेल्या घरगुती सिलेंडरचा ही स्फोट झाला. त्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. याशिवाय दुसऱ्या मजल्यावर अडकून पडलेल्या तीन महिला व दोन लहान मुलं यांना जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

या स्फोटामध्ये अग्निशमन दलाचे जवान व पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगेश भोईर, मिलिंद दळवी , वैभव राऊत, विवेक भोईर या अग्निशमन दलाच्या जवानांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणासाठी प्रयत्न केले. तर माजी नगरसेविका किरण चेंदवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही घटनास्थळी धाव घेत तेथील नागरिकांना मदत केली. मुरार बाग या इमारतीमध्ये शेकडो कुटुंब राहत आहे. या आग दुर्घटनेत सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या स्फोटात घरातील भिंत, खिडक्या व अन्य साहित्य याची नासधूस झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon