इफ्तारीचे फळ वाटताना झालेल्या वादात २० वर्षीय तरूणाची चाकूने भोसकून हत्या; पोलीसांनी एकाला घेतलं ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – देशभरात पवित्र रमजान महिना मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा करण्यात आला. मात्र, मुंबईतील ओशिवरामध्ये घडलेल्या एका घटनेमुळे गालबोट लागलं. इफ्तारीच्या फळ वाटपावरून वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि २० वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून एकाला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम मुंबईतील ओशिवरामध्ये ‘इफ्तारी’साठी फळं वाटप करत असताना वाद झाला होता. एका २० वर्षीय तरुणाचे दुसऱ्यासोबत जोरदार भांडण झालं. जोरदार भांडणात आरोपीने थेट २० वर्षीय मुलाची हत्या केली. जोगेश्वरी पश्चिममध्ये रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. मोहम्मद कैफ रहीम शेख असं मृताचं नाव आहे.जफर फिरोज खान (२२) आणि त्याच्या साथीदारांनी मोहम्मद शेख यांच्यावर हल्ला केला. वादावादीदरम्यान शेख याने खान यांना चापट मारली होती. दोघंही मुलांसाठी कपडे बनवण्याच्या दुकानात काम करतात. वादानंतर खान आपल्या मित्रांसोबत आला आणि शेखवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल. या घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप आहे. पोलीस याप्रकरणी कारवाई करत नसल्याचा आरोप करत कुटुंबाने केला आहे.