उत्तर प्रदेश येथून विमानाने यायचा, चोरी करुन निघून जायचा; कोट्यधीश चोरट्याला सोलापुरात बेड्या, ९ लाखांचा ऐवज जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
सोलापूर – घरफोड्या करण्यासाठी विमानप्रवास करुन येणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर प्रदेशमधून विमान प्रवास करून चोरटा मुंबईत यायचा. त्यानंतर रेल्वेने तो सोलापूर गाठायचा. सोलापुरात घरफोडी केल्यानंतर परत उत्तर प्रदेश येथील लखनऊ येथे जाण्यासाठी विमानातून प्रवास करायचा. आंतरराज्य चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या या अट्टल चोराला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. सोलापुरातील शिक्षणाधिकाऱ्याच्या घरी कुणी नसताना घरफोडी करून चोरी करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनिल कुमार मिस्त्रीलाल राजभर असे अटक केलेल्या संशयित गुन्हेगाराचे नाव आहे. राज्यभरात याच्यावर तब्बल ३५ गुन्हे दाखल आहेत.अनिल कुमार राजभर हा उत्तर प्रदेश येथील लखनऊ शहरातील रहिवासी आहे. तिथूनच तो घरफोडी करण्यासाठी विविध राज्यांत जात असत. उत्तर प्रदेश येथून दुसऱ्या राज्यात चोरी किंवा घरफोडी करण्यासाठी जाण्यासाठी तो विमानाने प्रवास करायचा. त्या राज्यात गेल्यानंतर इतर शहरात जाण्यासाठी तो बाय रोड किंवा रेल्वे प्रवास करत असल्याचे समोर आला आहे.
आरोपीने सोलापुरात शिक्षणधिकाऱ्याच्या घरी घरफोडी केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये परत निघून गेला. मात्र सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेला अनिल कुमार राजभर हा गुन्हा करण्यासाठी सोलापुरात येत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कसून तपास केल्यानंतर अनिल कुमार राजभर हा पोलिसांच्या ताब्यात आला. पोलिसांनी त्याच्याकडून ११ तोळे सोने आणि ११३ ग्रॅमचे चांदीचे दागिने असा एकूण ९ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अनिल कुमार राजभर याच्या विरोधात राज्यातील विविध ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत. उत्तर प्रदेश येथील लखनऊ येथे अनिल कुमार राजभर याचा एक कोटी रुपयांचा बंगला असल्याचे समोर आला आहे. त्यामुळे अनिल कुमार राजभर याच्या चोरी आणि घरफोडी करण्यासाठीच्या पॅटर्नची सर्वत्र चर्चा आहे.