पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

Spread the love

पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

योगेश पांडे / वार्ताहर 

नाशिक – निलंबित वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांबाबत नाशिक विभागीय आयुक्तांनी अहिल्यानगर जिल्हाधिकार्‍यांकडून मागविलेल्या अहवालात तब्बल १२ मालमत्तांचा उल्लेख आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून खेडकर कुटुंबियांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे खेडकर कुटुंबियांचे नॉन क्रिमिलिअर रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत मिळलेल्या माहितीनुसार पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर हे वर्ग एक अधिकारी असूनही पूजा खेडकर हिने नॉन क्रिमिलेअर गटातून यूपीएससी परीक्षेत आयएएसचे पद मिळविले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी उपविभागीय अधिकार्‍यांनी हे प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते. नाशिक विभागीय आयुक्तांनी या प्रमाणपत्राबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अहिल्यानगर जिल्हाधिकार्‍यांनी पूजा खेडकर हिचे वडील दिलीप व आई मनोरमा खेडकर यांच्या मालमत्तांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानुसार या दोघांच्या पॅनकार्ड नोंदीवर असलेल्या मालमत्तांची माहिती घेण्यासाठी पुण्यातील नोंदणी महानिरीक्षकांना पत्र लिहून मालमत्तांची माहिती मागितली होती. यात पूजा खेडकरच्या पालकांच्या नावावर तब्बल १२ मालमत्ता असल्याचे आढळून आले.

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला असून, याप्रकरणी सुनावणी पार पडली. खेडकर कुटुंबाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याने नॉन क्रिमिलिअर रद्द का करू नये? असा सवाल उपस्थित करत विभागीय आयुक्तांनी खेडकर कुटुंबियांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विभागीय आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूजा खेडकरच्या वडीलांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली असून विभागीय आयुक्तांनी त्यांना दोन आठवड्यांची मुदत दिल्याची माहिती समोर येत आहे. पुढील सुनावणीत दिलीप खेडकर काय म्हणणे मांडतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून खेडकर कुटुंबियांचे नॉन क्रिमिलिअर रद्द होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon