एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांना मोठ यश; २८६ किलो गांजा जप्त करत एकाला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी मोठी कारवाई केली. वांद्र्याच्या रेक्लेमेशन परिसरात छापेमारीची कारवाई करण्यात आली. तिथून पोलिसांनी २८६ किलो गांजा जप्त केला आहे. केसी मार्ग रोड परिसरात हे गोडाऊन आहे. मुंबईत विविध ठिकाणी सप्लाय करण्याच्या हेतूने इथे हा गांजा ठेवण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ९ चे प्रमुख दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही छापेमारीची कारवाई करुन गांजा जप्त करण्यात आला. ३६ वर्षीय इम्रान अन्सारी नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या विविध ठिकाणी हा गांजा पाठवण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी साडेसात ते नऊच्या दरम्यान छापा मारण्यात आला. गोडाऊनला टाळं लावण्यात आलं होतं. मागच्या अनेक महिन्यांपासून इमरान अन्सारी त्याच्या साथीदारांसह इथे राहत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
२८६ किलो मुंबईत एवढा गांजा आला कुठून? कोणाला विकणार होते? याचा शोध मुंबई पोलिसांच्या गुन्हे ९ शाखेकडून सुरु आहे. ही मोठी कारवाई आहे. यामुळे काही प्रमाणात अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा कशाप्रकारे व कोठून आला आणि कोणी पाठवला याचा तपास सुरू आहे. सध्या या गोडाऊनला टाळे ठोकलं असून अजून कोण-कोण आरोपी आहेत, याचा तपास सुरू झाला आहे.