दारूसाठी लाडक्या बहिणीचे पैसे तिच्या नवऱ्याने लाटल्याचे विचारताच संतापलेल्या नवऱ्याने व सासूने लाडक्या बहिणीवर केले कोयत्याने वार
पोलीस महानगर नेटवर्क
माढा – लाडकी बहीण योजनेच्या पैशांमुळे कुटुंबात कलह झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, त्यापैकी एक धक्कादायक घटना माढा तालुक्यातून समोर आली आहे. येथे पत्नीला मिळालेल्या लाडक्या बहिण योजनेच्या पैशांवर तिच्या पतीनेच डल्ला मारला आणि ते दारूसाठी खर्च केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे पैसै दारूवर का खर्च केले ? असा जाब विचारणाऱ्या महिलेवर तिच्या दारूड्या पतीने आणि सासूने थेट कोयत्याने हल्ला केल्याचा भयानक प्रकारही घडला आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. याप्रकरणी पती व सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितानुसार, माढा तालुक्यातील कुडूवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील लोणी गावातील हा भयानक प्रकार घडला आहे. तेथे राहणाऱ्या एका महिलेने लाडकी बहीण योजेसनाठी अर्ज केला होता. त्याअंतर्गत तिला दरमहा १५०० रुपये मिळतात. घरखर्चासाठी जपून पैसे वापरण्याचा त्या महिलेचा प्रयत्न होता. मात्र तिच्या पतीला दारूचे व्यसन आहे. आणि त्यातूनच त्याने हे भयंकर कृत्य केलं. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पत्नीला जे पैसे मिळाले, मद्यपी पतीने ते पैसे परस्पर काढून घेतले आणि सगळे पैसे त्याने दारूवर खर्च केले. त्या महिलेला ही बाब समजल्यानंतर तिने पतीला जाब विचारला. लाडक्या बहीण योजनेचे पैसे काढून दारु वर परस्पर खर्च का केले ? असा सवाल तिने पतीला केला. मात्र त्याला त्याचाच राग आला. त्याच रागातून त्या पतीने आणि त्याच्या सासूने मिळून, महिलेवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात ती महिला बरीच जखमी झाली असून मोठी खळबळ माजली. पण अन्याय सहन न करण्याचा निर्णय घेत पीडित महिलेने कुडूवाडी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेचा पती आणि सासू या दोघांविरोधातही ३२६ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. लाडक्या बहिण योजनेच्या पैश्यावरुन कुटूंबात कलह सुरु झाल्याचे प्रकार समोर येऊ लागले असून सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे.