धक्कादायक! दर्ग्याजवळ बोलावून ७५ वर्षीय व्यक्तीचा खून; दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राजधानी मुंबईत नेहमीच गुन्हेगारीच्या घटनांनी शहर हादरून जातं, कधी भाईगिरी, कधी अंमली पदार्थ तर कधी हत्येच्या घटनांनी मुंबई महाराष्ट्राचं लक्ष वेधते. आता, येथील मीरा भाईंदरच्या उत्तन परिसरात ७५ वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या वयोवृद्धाचा मृतदेह झाडाझुडुपात आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली असून पोलिसांनी गतीने तपास सुरू आहे. या प्रकरणी नायगावमध्ये राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीसह तिच्या १७ वर्षीय मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मृत व्यक्ती नायगावमध्ये स्वतःची कंपनी चालवत होते. १५ फेब्रुवारी रोजी रात्री ते एका १६ वर्षीय मुलीसोबत उत्तन नाका ते डोंगरी मार्गे धारावी देवी मंदिराकडे रिक्षाने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांनी मुलीच्या पोटावर हात फिरवून अश्लील वर्तन केल्याचा आरोप मुलीने केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अल्पवयीन मुलीने आपल्या १७ वर्षीय मित्रासोबत मिळून वृद्ध व्यक्तीचा खून करण्याचा कट रचला. या दोघांनी उत्तन परिसरातील बालेपिर शाह दर्ग्याजवळ संबंधित वृद्ध व्यक्तीला बोलावून घेतले. त्यानंतर डोक्यात लादी आणि दगडाने मारहाण करून त्यांचा निर्घृण खून केला. त्यानंतर, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह झाडाझुडुपात लपवून हे दोघे पसार झाले होते.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांनी संशयितांची ओळख पटवली आणि दोघांना ताब्यात घेतले. सध्या आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून, अधिक तपास केला जात आहे.