बारावीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला ?
शिक्षिकेच्या घराला आग, १२ वीच्या १७५ उत्तरपत्रिका जळून खाक
योगेश पांडे / वार्ताहर
विरार – एका शिक्षिकेच्या घरात बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याने पालक आणि विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. या घटनेचा अधिक तपास विरार पोलिस करत आहेत. बोर्डाच्या परिक्षांच्या उत्तर पत्रिकांबाबत अशाप्रकारचा हलगर्जीपणा वाढत असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या १२वीच्या परिक्षेच्या चिंतेतून विद्यार्थी मुक्त झाले असतानाच, विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे टेन्शन वाढवणारी एक घटना विरार येथे घडली आहे. १२वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन आलेल्या शिक्षिकेच्या घरात उत्तर पत्रिकांना आग लागली. विरार पश्चिम येथील गंगुबाई अपार्टमेंट, नानभाट रोड, बोळींज, आगाशी परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली आहे. या शिक्षिकेने १२ वी कॉमर्सचे पेपर रीचेकिंग साठी घरी आणले होते. या पेपरचा गठ्ठा त्यांनी सोफ्यावर ठेवला होता. काही वेळाकरिता शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले. शिक्षिकेचं घर बंद असताना अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि आग लागली. त्यामध्ये घरातील इतर सामानासहित विद्यार्थ्यांच्या बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिकाही जळून खाक झाल्या.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच विद्यार्थी आणि पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. संतप्त पालकांनी “असे पेपर घरी आणता येतात का ?” असा सवाल उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांसहीत त्यांच्या पालकांनी वर्षभर मेहनत घेतली होती. आधिच १२वी बोर्डाच्या परिक्षेमुळे विद्यार्थी आणि पालक टेन्शनमध्ये असतात. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता वाढली आहे. ही शिक्षिका कोणत्या शाळेची आहे? यात कुणाचा निष्काळजीपणा आहे? पेपर जाळले की जळाले? याचा बोळींज पोलीस तपास करत आहेत. या घटनेत ज्यांचा निष्काळजीपणा असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे बोळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन जीवितहानी झाली नसली तरी बारावीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर लागले आहे.