५ वर्षीय चिमुकलीचा जीव घेतला अन् जमिनीत पूरलं, पोलिसांना जादूटोण्याचा संशय; संशयित पती-पत्नी पोलिसांच्या तब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील एका गावातील असलेल्या व सध्या फोंडा येथून बेपत्ता झालेल्या ५ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह घराच्या बाजूलाच गाडलेल्या स्थितीत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. कसलये-तिस्क फोंडा येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. घराच्या बाजूला मुलीचा मृतदेह जमिनीत गाडलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वीच चिमुरडीची आई तिला घेऊन रत्नागिरीतून फोंडा येथे आपल्या आईच्या घरी रहायला गेली होती. चिमुरडीचा नरबळी दिल्याचा संशय पोलिसांना आहे. अमेरा ज्यडान अन्सारी असं या चिमुकलीच नाव आहे. ज्या घराशेजारी हा मृतदेह गाडलेल्या स्थितीत आढळला, त्या घराच्या मालकाला पत्नीसह फोंडा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा म्हणून नोंद केला असून, पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. या मुलीला मारून पुरल्याचे पती-पत्नीने कबूल केले आहे. त्यामुळे संशयित पप्पू ऊर्फ बाबासाहेब अलाट व त्याची पत्नी पूजा अलाट या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लग्नाला २० वर्षे उलटली तरी या दांपत्याला मुलबाळ होत नव्हते. त्यामुळे त्याने जादू टोण्याने मूल व्हावे, समृद्धी यावी यासाठी हे अघोरी कृत्य केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस त्यादृष्टीने चौकशी करीत आहेत.