बाईकचा धक्का लागल्याचा वादातुन झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू; तुळींज पोलीसांनी आरोपीच्या आई वडीलांसह पाच आरोपींना ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – विरार दुचाकीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नालासोपारा परिसरात घडली आहे. लोखंडाच्या सळईने डोक्यात वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला असून सौरभ मिश्रा – २६ असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पाच आरोपींना तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. नालासोपारा शेरा सर्कल परिसरात राहणारा २६ वर्षाचा तरुण सौरभ मिश्रा व त्याचे मित्र त्यांचा मित्र विवेक गुप्ता याचा सोमवारी वाढदिवस असल्याने मध्यरात्री केक कापून सेलिब्रेशन करणार होते. सचिन शर्मा, विवेक गुप्ता, सोनू खान आणि सौरभ मिश्रा हे सर्व मित्र त्यांचा एक मित्र नालासोपारा येथील संतोषभवन परिसरात राहत असलेल्या मित्राला दुचाकीवरून घेण्यासाठी जात होते. मोचीपाडा परिसरात अजय चौहान – २० आणि कौशिक चौहान – २१ यांना सौरभच्या बुलेट दुचाकीचा धक्का त्यांना लागला.
दुचाकीचा धक्का लागल्याने सौरभ आणि अजय, कौशिक चौहान यांच्यात वादावादी झाली, दोघांनी सौरभला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चौहान यांचे आई वडिल, मित्र सुनिल सोनावणे त्या ठिकाणी आले व त्यांनी देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. सौरभसोबत असलेल्या मित्रांनी ही वादावादी, मारहाण मध्यस्थी करत थांबवली. सौरभ व त्याचे मित्र दुचाकीवरून त्या ठिकाणाहून निघून जात असतानाच कौशिक चौहान त्याच्या घरातून लोखंडी सळई घेऊन बाहेर आला आणि सौरभच्या डोक्यात त्याने सळईने वार केला. यात गंभीररित्या जखमी झालेला सौरभ रक्तबंबाळ अवस्थेत थेट खाली कोसळला. रविवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. डोक्यात सळईने वार केल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या सौरभ मिश्रा याचा आचोळे येथील आयकॉन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात आरोपी कौशिक चौहान त्याचा भाऊ अजय चौहान, वडील अवधेश चौहान, आई सुनीता देवी चौहान आणि मित्र सुनिल सोनवणे या पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.