नीलम गोऱ्हे यांच्या माजी ओएसडी कडून ९ लाखांची फसवणूक, माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – मराठी साहित्य संमेलनातील नीलम गोऱ्हे यांचे मर्सडीज वक्तव्य गाजत असतानाच त्यांच्या माजी ओएसडीने केलेल्या फसवणूक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी नोकरीचे आमीष दाखवून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे ओएसडी राहिलेल्या एका अधिकार्याने ९ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. रत्नागिरीला राहणार्या विशाखा बनप यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा माहिम पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन चिखलीकर हे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचे ओएसडी असून त्यांनी ही फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी माहिम पोलीस ठाण्यात सचिन चिखलीकरसह चारूदत्त तांबे, तेजस तांबे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये चिखलीकर जिल्हा नियोजन बैठकिला रत्नागिरीला आले असताना रत्नागिरीत राहणार्या विशाखा बनप यांनी सरकारी नोकरीबाबत विचारताच चिखलीकर यानी २ लाखांची ऑफर केली. पैसे देताच चिखलीकर यांनी बनप यांची चारूदत्त तांबे यांच्याशी ओळख करून दिली. मात्र आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याने बनप यांनी चिखलीकर यांच्याकडे पैसै मागितले. त्यावर उत्तर देताना ते पैसे तांबेला दिल्याचे चिखलीकर यांनी सा़गितले. त्यानंतर तांबे याने रेल्वेत लिपीक पदावर नोकरीला लावून देण्याचे आश्वासन दिले. मात्र तीही परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द झाली असल्याचे तांबे यांनी सांगितले. त्यानंतर कृषी खात्यात नोकरीला लावतो, असे सांगण्यात आले. त्यासाठी आणखी १४ लाखांची मागणी करण्यात आली. दरम्यान, सप्टेंबर २०२३ मध्ये लिपीक पदाची परीक्षाही झाली. मात्र निकालात आपल्या मुलाचे नाव नसल्याचे समोर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे बनप यांच्या लक्षात आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विशाखा बनप यांनी तत्काळ पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आणि या प्रकरणी तक्रार दिली. तक्रारीनंतर माहीम पोलिसांनी या प्रकरणी सचिन चिखलीकर, चारूदत्त तांबे, तेजस तांबे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. तर दुसरीकडे चिखलीकर यांच्या विरोधात नेत्यांचे ओएसडी असताना अनेक तक्रारी आल्याने त्यांना हटवण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे आणखी काही प्रकरणे उजेडात येतात का हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. नीलम गोऱ्हे आणि ठाकरे यांच्या वाद चालू असतानाच हे प्रकरण बाहेर आल्याने नीलम गोऱ्हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.