वडाळ्यात भरधाव कारने आई आणि बाळाला चिरडले, १८ महिन्यांच्या बाळाचा जागीच मृत्यू
मुंबई – वडाळ्यात अंबेडकर कॉलेजजवळ, राम मंदिरच्या मागे, बाळाराम केडेकर मार्गावर रात्री उशिरा एक दुर्दैवी अपघात घडला. शनिवार रात्री १२:३० वाजता एमएच ०१ सिटी ७२५६ या भरधाव कारने २९ वर्षीय प्रिया निखिल लोंढे आणि तिच्या १८ महिन्यांच्या मुलगा वर्धन यांना चिरडले. हा अपघात घडल्यावर वर्धनचा जागीच मृत्यू झाला, तर प्रियाला गंभीर दुखापत झाली. प्रिया तिचा पती निखिल लोंढे आणि दोन मुलं – स्वरूप (५ वर्षे) आणि वर्धन (१८ महिने) यांच्यासोबत राहत होती. ते गेल्या ३० वर्षांपासून रस्त्याच्या कडेला झोपडपट्टीत राहत होते, पण बीएमसीने पुनर्वसन योजनेंतर्गत ती झोपडपट्टी हटवली. अनेक कुटुंबांना राहण्यासाठी खोल्या मिळाल्या, मात्र कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे प्रियासारख्या काहींना अजूनही घर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने खोली घेतली होती, पण काही सामान अजूनही फुटपाथवर होते.
अपघाताच्या दिवशी, निखिल आपल्या कुटुंबासाठी जेवण आणण्यासाठी दादर स्टेशनला गेला होता. त्या दरम्यान, प्रिया आणि वर्धन फुटपाथवर झोपले असताना भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना चिरडले. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना आणि आपत्कालीन सेवांना कळवले. आर.ए.के. मार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि चालक कमल विजय रिया (४६), रहिवासी वडाळा भाव्या हाइट्स, याला अटक केली. जखमी आई आणि मुलाला केईएम रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्रियाच्या खांद्याला आणि पाठीला गंभीर मार लागला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आर.ए.के. मार्ग पोलिसांनी भादवी कलम १०६, १२५(ब), आणि २८१ अंतर्गत गुन्हा क्रमांक ००३८/२०२५ नोंदवला आहे. पुढील पोलीस तपास सुरू आहे.