उल्हासनगर ३ परिसरातील ७ परमिटरूम च्या मालकाकडून शासनाची फसवणूक, एमआरपी पध्दतीने दुकाने थाटली

Spread the love

उल्हासनगर ३ परिसरातील ७ परमिटरूम च्या मालकाकडून शासनाची फसवणूक, एमआरपी पध्दतीने दुकाने थाटली

राज्य उत्पादन शुल्क चे स्थानिक निरीक्षक कुणाची चाकरी करतात

परमिट रूमची अनुज्ञाप्ती रद्द करण्याची मागणी

पोलीस महानगर नेटवर्क

उल्हासनगर – उल्हासनगर नं.३ परिसरात असलेले ७ हून अधिक परमिटरूम, बार व रेस्टॉरंट उल्हासनगर राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने डोळ्यादेखत करचुकवेगिरी करत आहेत. लाखो रुपये खर्च करून, प्रसंगी कर्ज काढून, प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण करून, रीतसर एखादा व्यक्ती देशी-विदेशी मद्य विक्री व्यवसाय चालू करतो, त्यातून शासनाला महसूल भेटत असतो पण उल्हासनगर परिसरातील (१) जॉली बार अँड रेस्टॉरंट, एफएल-३ /२६३१, (२) गीता भवन, एफएल -३/३३, (३) अंश पॅलेस, एफएल -३/१२७५, (४) न्यू नीलम रेस्टॉरंट अँड बार, एफएल -३/२८३, (५) देव प्लाझा बार अँड रेस्टॉरंट एनक्स, एफएल -३/२६१३, (६) मीट वाटिका, एफएल -३/२५२८, (७) साई फास्ट फूड रेस्टॉरंट अँड बार, एफएल -३/२२६४, अमन टॉकीज, उल्हासनगर नं.३ यांचे परमिटरूम चालवणारे सर्व मालक वाईन शॉप सारखे काऊंटर चालू करून बेकायदेशीरपणे देशी-विदेशी मद्य विक्री करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला जातोय. मात्र राज्य उत्पादन शुल्क स्थानिक अधिकारी थातुरमातुर कारवाई करून शासनाच्या बुडणाऱ्या महसूलापेक्षा त्यांच्या खिशाकडे अधिक लक्ष देत असतात असे उघडपणे बोलले जाते.

मुळात महाराष्ट्र राज्यात परमिट रूम, रेस्टॉरंट, बार, क्लब व इतर ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा परवाना घेण्याची गरज असते. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मद्यविक्री करण्यासाठीची नियमावली ही कठोर आहे. मात्र, मद्यविक्रेते या नियमावलीचे पालन करत नाहीत, हे वास्तव आहे. कधीही यावे आणि दारू घेऊन जावे, असा प्रकार उल्हासनगरमध्ये सुरू आहे. परमिट रूमचा परवाना असताना इतर ठिकाणावरून देशी-विदेशी मद्य आणून ते परमिटरुम बाजूला वाईन शॉप सारखा हुबेहूब काऊंटर उभा करून बेकायदेशीरपणे एमआरपी किंमतीत मद्य करून शासनाचा महसूल बुडवला जात आहे. विशेषतः शहरातील व परिसरातील वाईनशॉप पेक्षा परमिटरूमवर अनधिकृतरित्या होणारी दारू विक्री अधिक असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. परमिटरूम धारकांकडून शासनाला कसलाच नफा होत नाही, शासनाच्या नाकावर टिच्चून दिवसाढवळ्या बिनदिक्कत, राजरोसपणे मद्य विक्री केली जाते. सदर परमिट रूमचे मालक इतर वाईनशॉपच्या मालकांकडून देशी-विदेशी मद्य कमी दरात खरेदी करून परमिटरूमच्या काऊंटरवरून शासनाचा कर बुडवून फसवणूक विक्री केली जाते.

काय आहे कायदा?

परवाना नसताना मद्य बाळगणे तसेच परवाना नसलेल्यांना मद्यविक्री करणे हा गुन्हा आहे. ग्राहकाकडे परवाना आहे की नाही, हे पाहण्याची आणि त्यासाठी योग्य ती सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांवर टाकलेली आहे. या नियमांचे कोणीही मद्यविक्रेता पालन करत नाही. एकाही मद्य विक्री दुकानात मद्य सेवन परवाना विचारला जात नाही

वेळेच्या बंधनाची ऐशी की तैशी

उल्हासनगर परिसरातील हे ७ ही अनुज्ञाप्ती धारक परमिटरूम मध्ये बसून मद्य प्राशन करण्यासाठी सकाळी ते रात्री वेळेचे बंधन घालून दिलेले आहे. मात्र, उल्हासनगर मधील जॉली बार अँड रेस्टॉरंट, गीता भवन, अंश पॅलेस, न्यू नीलम रेस्टॉरंट अँड बार, देव प्लाझा बार अँड रेस्टॉरंट एनक्स, मीट वाटिका, साई फास्ट फूड रेस्टॉरंट अँड बार हे सर्व परमिटरूम रात्री ३.३० वाजेपर्यंत चालू ठेऊन मद्य विक्री करतात हा सर्व गैरप्रकार दैनिक ‘पोलीस महानगर’ च्या प्रतिनिधीने आपल्या कॅमेरात कैद केला आहे तसेच उल्हासनगर मधील या परमिटरूमचा परवाना रद्द करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजितदादा पवार, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले असून ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी आलेली आहे, तर ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी संबंधित परमिटरूम धारकांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon