साईबाबांच्या शिर्डीत भाविकांना लुटणारे दानव गजाआड; ९ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

Spread the love

साईबाबांच्या शिर्डीत भाविकांना लुटणारे दानव गजाआड; ९ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

योगेश पांडे / वार्ताहर 

शिर्डी – शिर्डीला साई दर्शनासाठी येणा-या भाविकांना लुटणा-या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोन दिवसापुर्वी सुरतवरुन शिर्डीला येणा-या भाविकांचे वाहन अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर येथील मोरख्यासह सात आरोपींना ताब्यात घेत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील या टोळीने लूटमार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवाशी मोहित पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत इर्टिगा वाहनातून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांचे वाहन सकाळी सहाच्या दरम्यान लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आले होते. त्यावेळी दुसऱ्या एका चार चाकी वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळीने ओव्हरटेक करत पाटील यांचे वाहन थांबवले. यावेळी आरोपींनी हातातील बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार केली.

मोहित पाटील यांच्याकडील सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांचे पथक आणि कोपरगाव पोलिस यांनी समांतर तपास करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावला आहे. गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा श्रीरामपूर येथील विजय गणपत जाधव याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचत आरोपी विजय जाधव याच्यासह त्याच्या टोळीतील सिद्धार्थ भाऊसाहेब कदम, राहुल संजय शिंगाडे, सागर दिनकर भालेराव, समीर रामदास माळी आणि दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून लोखंडी कत्ती, गावठी कट्टा, एअर गण, धातूच्या अंगठ्या, चैन असा ९ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेतील आरोपी सराईत गुन्हेगार असून या आधी ही त्यांनी दरोडा आणि जबरी चोरीचे चार गुन्हे केल्याचे पोलिस तपासात समोर आलंय. तर आरोपींनी रोख रक्कम आपापसात वाटून घेत सोन्या चांदीचे दागिने नाशिक येथील एका सोनाराला विकल्याची कबुली दिली आहे. रस्तालूट आणि दरोड्यातील सराईत टोळी हाती लागल्याने पोलिस या प्रकरणी कसून तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon