पंजाब नॅशनल बँकेला कंपनीनं लावला २७० कोटींचा चुना; रिझर्व्ह बँकेकडून माहिती
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – देशात, राज्यात सर्वच ठिकाणी फसवणूकीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चालले आहे. यापूर्वी अनेक बँकांना चुना लावण्यात आलेला आहे, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला असला तर त्यातील अनेकांनी देशातून पलायन केलं आहे. असाच एक कर्ज घोटाळा देशात उघडकीस आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनं २७०.५७ कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याची माहिती रिझर्व्ह बँकेला दिली. ओडिशाच्या गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीनं हा घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे. गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला कंपनीनं जामीन मंजूर केल्याचं पीएनबीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. या फसवणुकीची माहिती रिझर्व्ह बँकेला देण्यात आली आहे. गुप्ता पॉवरने भुवनेश्वर येथील बँकेच्या स्टेशन स्क्वेअर शाखेतून हे कर्ज घेतले होतं.
पंजाब नॅशनल बँकेने दिलेल्या माहितीनुसार, विहित निकषांनुसार बँकेनं यापूर्वीच २७०.५७ कोटी रुपयांच्या कर्जाची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे २०२४ मध्ये देशातील बँक घोटाळ्यांमध्ये २७ टक्क्यांनी वाढ झाली. एप्रिलअखेर संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बँकिंग फसवणुकीची प्रकरणे १८,४६१ वर पोहोचलीत. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत अशा प्रकारची १४ हजार ४८० प्रकरणे समोर आली होती. फसवणुकीची रक्कम ८ पटींनी वाढून २१,३६७ कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे पंजाब नॅशनल या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला चुना लावण्यात आला आहे.