महाकुंभ हेलिकॉप्टर राईडच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक; कफ परेड पोलिसांची कारवाई
मुंबई – कफ परेड पोलिस ठाण्यात महाकुंभ मेळाव्यात हेलिकॉप्टर राईड बुक करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी श्रीमती कोठेकर यांनी गुगलवर म्हाकुंभ हेलिकॉप्टर राईड असे सर्च केल्यानंतर https://mahakumbhhelicopterservice online या वेबसाइटवरून संपर्क साधला. आरोपींनी मोठ्या सवलतीचे आमिष दाखवून फिर्यादींकडून ६०,६५२/- रुपये उकळले. मात्र, पैसे सरकारी पवन हंस कंपनीऐवजी एका खाजगी खात्यात गेल्याने त्यांना संशय आला. पुढील तपासात ही वेबसाइट गायब झाल्याचे लक्षात आले.
याच पद्धतीने कुलाबा येथील संकल्प जगदाळे (वय २५) यांचीही फसवणूक झाली होती. तपासात या गुन्ह्यातील रक्कम बिहारच्या बिहार शरीफ येथील विविध एटीएम केंद्रांतून काढण्यात आल्याचे आढळले. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे अविनाशकुमार उर्फ बिट्टू याला अटक केली. चौकशीत त्याने सांगितले की, ही फसवणूक मुख्य सूत्रधार मुकेशकुमार याच्या नियोजनानुसार केली होती. आरोपींनी बनावट वेबसाइट तयार करून हेलिकॉप्टर राईड बुकिंगच्या नावाखाली अनेकांना फसवले.
मुख्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी नागपूर स्थानकावर कारवाई करत मुकेशकुमार आणि सौरभकुमार यांना अटक केली. तसेच, गैरमार्गाने सिम कार्ड पुरवणारी सृष्टी बर्नावल हिला मुंबईतून अटक करण्यात आली. पीओएस एजंटमार्फत सीम कार्ड गोळा करून बिहारला पाठवणारा संजितकुमार यालाही ताब्यात घेण्यात आले.
सदर गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ०१) डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त (कुलाबा विभाग) शशिकिरण काशिद आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपास अधिकारी
पोलीस निरीक्षक जयदीप गायकवाड, सायबर अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अमित देवकर, पोलीस उप निरीक्षक रूपेशकुमार भागवत, प्रविण रणदिवे, तसेच सायबर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने परिश्रम घेतले. या पथकात स.पो.उ.नि. म्हात्रे, पो.ह. राठोड, तांडेल, पाटील, सचिन पाटील, ताटे, काले, यादव, गुंजाळ आणि देशमुख या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
मुंबई पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन व्यवहार करताना अधिकृत वेबसाइट आणि पेमेंट गेटवेची खातरजमा करण्याचे सांगण्यात आले आहे.