विधवा महिलेशी लग्न करून तिचे दागिने चोरणाऱ्या अट्टल चोराला दिंडोशी पोलिसांनी पुण्यात ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात एका विधवा महिलेशी लग्न करुन तिचे दागिने घेऊन पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद नाईक (५१) असे या आरोपीचे नाव आहे. दिंडोशी पोलिसांनी घटना घडल्यानंतर १५ दिवसांनी पुण्यातून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद नाईक विधवा महिलेशी लग्न करुन मुंबईहून पळ काढला होता. त्याने तिचे सोन्याचे दागिने चोरले होते. यानंतर त्याने चोरीचे सोन्याचे दागिने पुण्यातील एका सोन्याच्या कर्ज कंपनीला विकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला त्याची अपेक्षित किंमत मिळाली नाही. त्यामुळे तो दुसऱ्या खरेदीदाराचा शोध घेत होता. यादरम्यान पोलीस हे आरोपीचा शोध घेत होते.
पोलीस तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की आरोपी पुण्यातील बाणेर परिसरात आहे. तिथून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी अंदाजे २९.५ तोळे सोने, १.५ किलो चांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम जप्त केली. प्रमोद नाईकने हा सर्व मुद्देमाल त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या मालाड येथील घरातून चोरला होता. प्रमोदने त्यांच्या दुसऱ्या पत्नीला सांगितले होते की त्याची पहिली पत्नी आणि दोन मुले यांचा कोविडदरम्यान मृत्यू झाला. मात्र प्रत्यक्षात ते अजूनही जिवंत आहेत आणि मुंबईतील गिरगाव येथे राहतात. लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे. प्रमोद नाईकवर मालाडमधील एका इव्हेंट कंपनीत काम करत होता. या ठिकाणी त्याने फसवणूक केली होती. त्याने त्याच्या खात्यात २५ लाख रुपये फसवणूक करुन ट्रान्सफर करुन घेतले होते, असा आरोप त्याच्यावर होता. तपासादरम्यान असे आढळून आले की प्रमोद नाईक ४५-५५ वयोगटातील विधवांची मॅट्रिमोनियल साइट्सवरुन माहिती काढायचा. लग्नाच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करायचा. गेल्या महिन्यात एका ५० वर्षीय महिलेला त्याने फसवले होते. प्रमोद नाईक चार ते पाच महिलांच्या संपर्कात होता आणि त्यांच्याशी लग्न करून त्यांना अशाच प्रकारे फसवण्याचा त्याचा हेतू होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.