बहीण-भावाच्या डोक्यावर २५ लाखांचं कर्ज, राहत्या घरात १५ दिवसांपूर्वी विषारी द्रव्य पिऊन केली आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – वसई येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वसईच्या एव्हरशाईन सिटी येथील मंगल वंदन सोसायटीत राहणाऱ्या बहीण-भावाच्या डोक्यावर २५ लाखांचं कर्ज झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत होते. त्यांच्या राहत्या घराचा दरवाजा १५ दिवसांपासून बंद असल्याने घरमालकाने पोलिसांना बोलावून ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला, त्यावेळी सर्वच हादरून गेले. बहिण-भावाचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कर्जबाजारीपणाला कंटाळून पंधरा दिवसापूर्वीच बहीण भावांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हनुमंता श्रीधर प्रसाद – ४० आणि यमुना श्रीधर प्रसाद – ४५ असे मयतांचे नावं आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हनुमंता श्रीधर प्रसाद आणि यमुना श्रीधर प्रसाद हे वसईच्या एव्हरशाईन सिटी येथील मंगल वंदन सोसायटीत राहतात. दोघे ही कर्जबाजारी झाले होते. त्यांच्यावर २५ लाखांचे कर्ज होते. तसेच ऑफीसमधील काही लोक आणि मोठ्या भावाकडून ते उसने पैसे मागत होते.
यानंतर दोघा बहीण भावांनी राहत्या घरात बेडरुममध्ये विषारी द्रव्य पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. गेल्या पंधरा दिवसापासून घराचे दार न उघडल्याने तसेच घरातून दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने सोमवारी दुपारी ११२ नंबरवर कॉल करुन पोलिसांना बोलावून घेतले. यावेळी पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीच्या सहाय्याने घरात प्रवेश केल्यानंतर दोघा बहिण भावांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या आचोळे पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.