मित्रांसोबत रेल्वे रुळावर सेल्फी काढण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा भरधाव ट्रेनच्या धडकेत मृत्यू

Spread the love

मित्रांसोबत रेल्वे रुळावर सेल्फी काढण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा भरधाव ट्रेनच्या धडकेत मृत्यू

योगेश पांडे/वार्ताहर 

अंबरनाथ – नातेवाईक आणि मित्रांसोबत रेल्वे रुळावर सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा भरधाव ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. अंबरनाथ-बदलापूर दरम्यान उड्डाणपुलाखाली रेल्वे रुळावर सेल्फी घेत असताना या २४ वर्षीय तरुणाला लांब पल्ल्याच्या ट्रेनने धडक दिल्याने दुद्रैवी मृत्यू झाला आहे, पोलिसांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली. या घटनेने परिसरात एकट खळबळ माजली. ही घटना मंगळवारी घडल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी मंगळवारी संध्याकाळी अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांदरम्यान उड्डाणपुलाखाली ही घटना घडली असल्याची माहिती कल्याण येथील रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने दिली.

जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, या घटनेत साहिर अली नावाच्या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. साहिर अली हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी होता. तो मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात नातेवाईकांना भेटायला आला होता. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. साहिर हा मंगळवारी आपल्या नातेवाईक आणि मित्रांसह अंबरनाथ-बदलापूर दरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळाजवळ गेला होता. तिथे सेल्फी आणि ग्रुप फोटो काढण्यासाठी हे लोक गेले असल्याची माहिती आहे. मात्र, यावेळी सेल्फी काढण्याच्या नादात मागून भरधाव वेगात कोयना एक्स्प्रेस येत आहे हे त्याच्या लक्षातच आलं नाही. वेळीच रेल्वे रुळावरुन बाजूला होत न आल्याने भरधाव कोयना एक्स्प्रेसने साहिरला धडक दिली आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. ट्रेनने हॉर्न वाजवला, तिथल्या लोकांनीही त्याला आवाज दिला, पण त्याने लक्ष दिलं नाही, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच जीआरपी जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी साहिरचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon