महाराष्ट्रात गुजरातवरून अंमली पदार्थांची तस्करी सुरुच
पती जेलमध्ये तर पत्नीकडून नशेचा बाजार सुरळीत; छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीचं मोठं प्रकरण उघडकीस, गँगस्टर जोडप्याला अटक
योगेश पांडे/वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीचं मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका गँगस्टर जोडप्याला अटक केली आहे. यातील आरोपी पती हा कुख्यात गुंड असून त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. एका प्रकरणात आरोपी पती तुरुंगात गेल्यानंतर महिलेनं पतीचा धाक दाखवून नशेचा बाजार सुरू केला होता. आरोपी महिला गुजरातवरून अमली पदार्थ आणत होती आणि या पदार्थांची विक्री ती संभाजीनगर शहरातील विविध भागात करत होती. पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या पतीला अटक केली आहे. दोघांवर अमली पदार्थांच्या तस्करीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची पुढील तपास पोलीस करत आहेत.
अजय वाहूळ उर्फ ठाकूर असं आरोपी कुख्यात गुंडाचं नाव आहे. तर राणी ठाकूर असं अटक केलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे. आरोपी अजय ठाकूर आणि राणी ठाकूर मागील काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थ विक्रीचं नेटवर्क चालवत होते. या घटनेची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील साईनगर परिसरातील आरोपींच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना घरात एमडी ड्रग्जची पावडर, गांजा आणि नशेच्या काही गोळ्या असा एकूण १ लाख ५ हजार ३८७ रुपयांचा मुद्देमाल सापडला. आरोपी गुजरातच्या सुरतमधील आयेशा नावाच्या एका महिलेकडून हा माल विकत घेत होते आणि हा माल संभाजीनगर शहरात विक्री करत होते. याबाबतची कबुली आरोपी ठाकूर याने पोलिसांना दिली आहे. विशेष म्हणजे अजय ठाकूर हा कुख्यात गुंड असून तो सहा वर्षांपासून जेलमध्ये होता. त्यावेळी त्याची पत्नी राणी ठाकूर ही अमली पदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय सांभाळत होती. माझा नवरा डॉन आहे, असे धमकावत ती दादागिरी करून अमली पदार्थांचा धंदा करायची. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.