२५ हजार रुपयांसाठी मित्राची दगडाने ठेचून हत्या; ९ दिवसांनी आरोपी मित्रांना अटक करण्यात पोलीसांना यश

Spread the love

२५ हजार रुपयांसाठी मित्राची दगडाने ठेचून हत्या; ९ दिवसांनी आरोपी मित्रांना अटक करण्यात पोलीसांना यश

योगेश पांडे/वार्ताहर 

नवी मुंबई – नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरातील एका डोंगराच्या पायथ्याला नऊ दिवसांपूर्वी एक खुनाची घटना घडली होती. इथं एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. अत्यंत भयंकर अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता. पण हा सगळा परिसर निर्जन असल्याने ही हत्या नेमकी कुणी आणि कशासाठी केली? याची काहीच लिंक पोलिसांना मिळत नव्हते. अखेर हत्येच्या ९ दिवसानंतर पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे. संबंधित तरुणाची त्याच्याच जीवलग मित्राने हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. दीपक बिन्द आणि दीपक गौंड असं अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावं आहेत. तर मनोज बिन्द असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. दोन्ही आरोपींची चौकशी केली असता त्यांनीच ही हत्या केल्याचं समोर आलं आहे. २५ हजार रुपयांसाठी ही हत्या केल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

नवी मुंबईच्या रबाळे एमआयडीसीतील यादवनगर येथील रहिवासी असणाऱ्या मनोज सभाजित बिन्द याची हत्या करण्यात आली होती. मयत राहात असलेल्या परिसरातील डोंगर पायथ्याजवळ दगडाने ठेचून ही हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणी दीपक बिन्द आणि दीपक गौंड या दोघांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. मयत आणि आरोपी हे दोघेही मित्र होते. दोघांमध्ये घट्ट मैत्री असल्याने आरोपीला मयताच्या एटीएम कार्डचा पासवर्ड समजला होता. एटीएमचा पासवर्ड समजणं हेच तरुणाच्या खूनाचं कारण ठरलं आहे. कारण आरोपी दीपक बिन्द याने मयत तरुणाचं एटीएम कार्ड चोरून त्याच्या खात्यतून २५ हजार रुपये काढले होते. ही चोरी लपवण्यासाठीच त्याने आपल्या जीवलग मित्राचा खून केला. एटीएममधून पैसे काढल्याचं सीसीटीव्हीच्या माध्यमातून मित्राला समजेल, या भीतीपोटी आरोपी दीपक बिन्द याने मनोजची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पैशाच्या देवाण घेवाणीवरूनच हत्या झाल्याचं निष्पन्न झालं आहे . या घटनेचा अधिक तपास रबाळे पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon