दाम दुप्पट करण्याच्या आमिषात अडकलेल्या मॅनेजरनेचं लुटली बँक
ड्रायक्लीनर्सवरच्या छापेमारीत ५ कोटींची रक्कम जप्त; मॅनेजरसह दिल्ली, उत्तराखंड, रायपूर, गोंदिया अन् भंडाऱ्यातील ९ जणांना अटक
योगेश पांडे/वार्ताहर
भंडारा – भंडाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात दाम दुप्पट करण्याच्या प्रलोभनाला नागरिक बळी पडल्याचं आतापर्यंत अनेकदा ऐकिवात आहे. मात्र, भंडाऱ्यात चक्क ॲक्सिस बँकेचा मॅनेजरचं दाम दुप्पट करण्याच्या अमिषाला बळी पडला आणि त्यानं चक्क बँकचं लुटल्याची थक्क करणारी घटना समोर आली आहे. भंडाऱ्याच्या तुमसर इथं ॲक्सिस बँक असून, गौरीशंकर बावनकुळे असं बँक मॅनेजरचं नाव आहे, ज्यांनी दाम दुप्पट करून मिळेल या हव्यासापोटी चक्क बँकेतील ५ कोटी रुपये लुटल्याची थक्क करणारी घटना समोर आली आहे. या मॅनेजरला बँकेतीलचं एका कर्मचाऱ्यानं साथ दिली असून बँकेतून काढलेली संपूर्ण रक्कम तुमसरच्या इंदिरानगर येथील राजकमल ड्रायक्लीनर्समध्ये ठेवली होती.
ॲक्सिस बँके मॅनेजरला दिल्ली, उत्तराखंड, रायपूर, गोंदिया येथील एका टोळीनं ५ कोटी रुपयांच्या बदल्यात ७ कोटी रुपये देण्याचं आमिष दिलं होतं. या आमिषाला बळी पडलेल्या मॅनेजरनं बँकेतून ही रक्कम काढली होती. मात्र, भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना याची गुप्त माहिती मिळाली आणि त्यांनी पोलिसांच्या मदतीनं राजकमल ड्रायक्लीनर्सवर छापा टाकला. यात संपूर्ण ५ कोटीची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. ही संपूर्ण रक्कम मोजण्याकरिता बँकेतील पैसे मोजण्याच्या मशीनचा वापर भंडारा पोलिसांना करावा लागला. भंडारा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ५ कोटींची रक्कम जप्त केली असून बँक मॅनेजरसह ९ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.