टोळक्याची तरुणाला कोयत्याने बेदम मारहाण; पोलिसांनी ७ जणांना ठोकल्या बेड्या, ३लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त.
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बोपदेव घाट तसेच त्या घाटात असलेल्या ट्रिनिटी कॉलेज परिसरात दहशत बसविण्यासाठी कॉलेजच्या समोरील रस्त्यावर तरुणाला कोयत्याने बेदम मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. कोंढवा पोलिसांनी सात जणांना बेड्या ठोकत या आरोपींकडून शस्त्र तसेच वाहने जप्त केली आहेत. भावेश बाळासाहेब कुंजीर (२३),अथर्व कैलास पवार (२१) ,सुरज सचिन राऊत (२१) ,आर्यन विलास पवार – (१८) ,सौरभ प्रदिप लोंढे (१८) ,राज दिगंबर रोंगे (१९) आणि वरुण बबन भोसले (२१) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश देसाई, विशाल मेमाणे व त्यांच्या पथकाने केली.
ट्रिनिटी कॉलेजसमोरील रोडवर १६ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता विश्वजित बाबाजी हुलवळे (१९) याला कोयत्याने मारहाण करुन जबर जखमी केले होते. त्यावरुन कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतताना १८ जानेवारी रोजी पोलीस हवालदार सतिश चव्हाण व विशाल मेमाणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी हे राज रोंगे याच्या येवलेवाडीतील सिंगापूर होम्स येथे लपले आहेत. पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन घरावर छापा घालून सातही आरोपींना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली धारदार शस्त्रे व वाहने असा एकूण ३ लाख ८० हजारांचा माल जप्त केला आहे.