भिक मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या दोन महिलांना अंबरनाथ मधून अटक करण्यात पोलीसांना यश

Spread the love

भिक मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या दोन महिलांना अंबरनाथ मधून अटक करण्यात पोलीसांना यश

योगेश पांडे/वार्ताहत 

उल्हासनगर – भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या दोन महिलांना अंबरनाथ मधून पकडण्यात आले आहे. लहान मुलांना घेऊन भिक्षा मागणाऱ्या या दोन महिलांचा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण तपासत महिलांना अंबरनाथमधून ताब्यात घेतले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. उल्हासनगरच्या वाल्मिक नगर भागात गेल्या काही दिवसांपासून लहान मुले चोरी करणाऱ्या महिलांबद्दलची चर्चा समाज माध्यमांवर सुरू होती. या चर्चेमागे खरंच काही तरी आहे का, हे समजण्यासाठी पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला होता. याबाबत एक सीसीटीव्ही चित्रण समोर आले.यात दोन महिलांच्या संशयास्पद हालचाली सीसीटीव्हीत चित्रित झाल्या होत्या. मागील आठवड्यात दोन महिला भिक्षा मागण्याच्या निमित्ताने वाल्मिक नगर परिसरात फिरत होत्या. हातात लहान मुल घेऊन घराघरांतून भिक्षा मागणाऱ्या या महिलांनी काही घरांमध्ये प्रवेश करून मोबाईल आणि रोख रक्कम चोरली.

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सीसीटीव्ही चित्रण व्हायरल झाल्यानंतर, या महिलांबद्दल ‘मुलं चोरी करणाऱ्या टोळीचा भाग’ असल्याच्या चर्चा पसरल्या. सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे उल्हासनगर पोलिसांनी तपासाला गती दिली. सीसीटीव्हीत दिसलेल्या महिलांचा मागोवा घेत अखेर त्यांना अंबरनाथ येथून अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. या महिला भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करत होत्या. घरातील लोकांचा गोंधळ उडवत, त्या लहान मुलांचा वापर करून सहज चोरी करत असत, असे तपासत समोर आले. त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेले काही मोबाईल आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर उल्हासनगर पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देण्यापूर्वी विचार करण्याचा आणि संशयास्पद हालचालींवर सतत लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon