पोक्सो गुन्ह्यातील दोन आरोपींच्या मुसक्या उत्तर प्रदेश मधून मुंबई पोलिसांनी आवळल्या
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – मानखुर्द पोलीस ठाण्यात सन २०२३ मध्ये एक गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यातील दोन आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते. सदर आरोपींना मानखुर्द पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक करुन मुंबईत आणण्यात आले आहे अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधु घोरपडे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२३ मध्ये गु.र.क्र ६८८/२०२३ कलम ३७६,३७६(२)(एन) भादवि सह कलम ४,८,१२ पोक्सो अंतर्गत नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील फरार आरोपी मस्तान खान हा गुन्हा घडल्यापासून मोबाइल बंद करून मागील एक वर्षापासून राहत्या परिसरातून पळून गेला होता. त्यानंतर त्याचा शोध घेत असताना त्याचा मोबाइल वारंवार ट्रेस केला असता त्याने नवीन मोबाइल नंबर चालू केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरून नमूद आरोपी हा चंद्रपूर, राजस्थान तसेच उत्तर प्रदेशातील गोंडा यासारखी राहण्याची ठिकाणे बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यास विलंब होत होता. सदर आरोपी हा खिंडोरी गाव जिल्हा गोंडा राज्य उत्तर प्रदेश येथे राहत असल्याची खात्री झाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आंबेकर व त्यांचे पथक वरिष्ठांच्या परवानगीने उत्तर प्रदेश राज्य येथे रवाना झाले होते. सदर ठिकाणी जाऊन तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून कटरा बाजार पोलीस ठाणे जिल्हा गोंडा राज्य उत्तर प्रदेश येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सदर आरोपीस सापळा रचून शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी गु.र.क्र ४२०/२०२४ कलम ६४ (२)(उ ),६४(१),६९,३१८(४) बीएनएस सह ४,६,८,१० पोक्सो या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी विकास चव्हाण हा गुन्हा घडल्यापासून मोबाइल बंद करून मागील दोन महिन्यापासून राहत्या परिसरातून पळून गेला होता. त्याचा शोध घेत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे त्याने नवीन मोबाइल नंबर चालू केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्या वरून तो नौतवना गाव, जिल्हा बस्ती राज्य उत्तर प्रदेश येथे वास्तव्य करत असल्याची खात्री झाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आंबेकर व पथक वरिष्ठांच्या परवानगीने उत्तर प्रदेश राज्य येथे रवाना झाले होते. सदर ठिकाणी जाऊन तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून छावणी पोलीस ठाणे जिल्हा बस्ती राज्य उत्तर प्रदेश येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सदर आरोपीस सापळा रचून शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस उप आयुक्त नवनाथ ढवळे परिमंडळ ६ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु घोरपडे यांच्या मार्गदर्शना खाली, सपोनि किरण आंबेकर, पोलिस कर्मचारी पाटील, शिंदे, चौधरी यांनी उत्तम कामगिरी केली.