तुरूंगातून सुटलेल्या गुंडांची जिथं मिरवणूक निघाली, पोलिसांनी तिथेच धींड काढली
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पुण्यात मोक्कामध्ये सुटलेल्या कुख्यात गुंडाची जेलमधून बाहेर आल्यानंतर आलिशान कारमधून रॅली काढली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मोक्कामध्ये येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा २ दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे ५० – ६० समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली. आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली. या गुन्ह्यातील नऊ आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक करत त्यांची शहरात धिंड काढली. येरवडा पोलिसांनी रॅली काढणाऱ्या आरोपींना दणका दिला. २०२१ मध्ये पुणे शहरातील गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला होता. पुणे शहरातील येरवडा परिसरामध्ये खुनी हल्ला करुन दहशत पसरवणाऱ्या टोळीवर गँगच्या म्होरक्यासह १३ जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.
टोळी प्रमुख प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे याच्यावर मोक्का कारवाई झाली होती. आरोपी कसबे याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे केले आहेत. आरोपींवर टोळीचे वर्चस्व निर्माण करुन खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.