तरुणांनी आयुष्य उत्साहात जगावे; पण दारू पिऊ नये, आयुष्य आनंदात जगावे – विनोद कांबळी
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला रुग्णालयातून डिस्चार्ज; हातात बॅट, स्ट्रेट ड्राईव्ह लगावत स्वतःच्या पायावर रुग्णालयाबाहेर
योगेश पांडे/वार्ताहर
भिवंडी – भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी प्रकृती बिघडल्यामुळे काही दिवसांपासून काल्हेर येथील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.बुधवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयात येताना व्हिलचेअरचा आधार घेऊन आल्यानंतर बुधवारी मात्र विनोद कांबळी आपल्या बिनधास्त शैलीत हातात बॅट घेऊन बाहेर पडला. क्रिकेट खेळत स्ट्रेट ड्राईव्ह लगावत स्वतःच्या पायावर जात असतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. तसेच बरे झाल्यानंतर विनोद कांबळीने तरुणांना संदेशही दिला. डिस्चार्जवेळी विनोद कांबळी म्हणाला, मी आधीच म्हणालो होतो की, बरा होऊनच मी इथून बाहेर पडणार. शिवाजी पार्कात मी विनोद कांबळी असल्याचे सर्वांना दाखवून देणार. मी क्रिकेट कधीही सोडणार नाही. मी पुन्हा मैदानावर दिसेल. या उपचारादरम्यान मला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले. प्रेम दिले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. नवीन वर्षांनिमित्त तरुणांना संदेश देताना विनोद कांबळी म्हणाला की, तरुणांनी आयुष्य उत्साहात जगावे, पण दारू पिऊ नये. आयुष्य आनंदात जगावे.
दोन दिवसांपूर्वीच विनोद कांबळीचा रुग्णालयात नृत्य करतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. ५२ वर्षीय विनोद कांबळीला २१ डिसेंबर रोजी भिवंडीमधील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात ‘चक दे इंडिया’ या गाण्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्याबरोबर नृत्य करतानाचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.