मुंबईत व्यावसायिकाचं घर लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या बुरखाधारी व्यक्ती गजाआड; पीडित महिलेनं प्रसंगावधान दाखवत चोरट्याला पकडलं
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – मुंबईच्या माझगाव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका बुरखाधारी व्यक्तीने बंदूक घेऊन व्यावसायिकाचं घर लुटण्याचा प्रयत्न केला. त्याने घरातील १४ वर्षीय मुलीच्या डोक्याला बंदूक लावून घरातील किमती ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला. पण पीडित मुलीच्या आईनं प्रसंगावधान दाखवत चोरट्याच्या हातून बंदूक हिसकावून घेतली. यानंतर आरडाओरडा करत शेजाऱ्यांच्या मदतीने आरोपीला पकडलं आहे. या प्रकरणातला आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून त्याच बिल्डींगमध्ये काम करणारा कामगार निघाला आहे. तौरीकुल दलाल असं आरोपीचं नाव असून त्याला भायखळा पोलिसांनी अटक केली आहे. माझगाव येथील जास्मीन अपार्टमेंटच्या दहाव्या मजल्यावर राहणारे व्यावसायिक उमर शम्सी यांच्या घरात ही घटना घडली आहे.
घटनेच्या दिवशी व्यावसायिक उमर शम्सी काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. यावेळी घरात शम्सी यांच्या पत्नी सुमेरा आणि १४ वर्षांची मुलगी रिदा या दोघीच होत्या. हीच संधी साधून आरोपी तौरीकुल शम्सी यांच्या घरात शिरला. यावेळी त्याने स्वत:ची ओळख लपवण्यासाठी बुरखा परिधान केला होता. घरात शिरल्यानंतर त्याने रिदाच्या डोक्याला बंदूक लावली आणि शम्सी यांच्या पत्नी सुमेरा यांच्याकडे मौल्यवान दागिने आणि मोबाइलची मागणी केली. सुरुवातीला हा सगळा प्रकार कुणीतरी मस्करीतून करत असावा, असं सुमेरा यांना वाटलं. मात्र घरात खरंच चोर शिरलाय, हे लक्षात येताच सुमेरा यांनी प्रसंगावधान दाखवलं. घरातील सगळे दागिने शेजारच्या घरात ठेवल्याचं त्यांनी सांगितलं. हे दागिने घेऊन येण्याच्या बहाण्याने सुमेरा यांनी आरोपीच्या हातातली बंदूक हिसकावली आणि आरडाओरडा केला. यावेळी मदतीसाठी धावत आलेल्या शेजाऱ्यांनी आरोपी तौरीकुलला पकडलं. ज्यावेळी स्थानिकांनी आरोपीला बुरखा काढायला लावला, तेव्हा आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून अकराव्या मजल्यावर काम करणारा तौरीकुल दलाल, हाच असल्याचं समोर आलं. एवढंच नव्हे तर आरोपीनं गुन्ह्यासाठी वापरलेली बंदूक देखील खेळण्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.