दुचाकीस्वार चोरट्यांकडून पादचाऱ्यांना धमकावून मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या स्नॅचर टोळीला हडपसर पोलिसांकडून अटक
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावून त्याला ३०० फुटापर्यंत फरफटत नेणाऱ्या मोबाईल स्नॅचर टोळीला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेत पादचारी तरुण जखमी झाला होता. चोरट्यांकडून गुन्ह्यातील मोबाईल तसेच त्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यांनी आणखीही काही गुन्हे केल्याची शक्यता आहे. मंथन त्रिलोक पवार (१९), रोहीत किरण वाणी (२१) व कृष्णा संजय वाणी (२०) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा नोंद आहे. ही कारवाई परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, निखील पवार व त्यांच्या पथकाने केली आहे. शहरात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. पादचाऱ्यांना अडवून, त्यांना धमकावून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या जात आहेत. दोन दिवसांपुर्वी हडपसरमधील डी.पी. रोडवरून पायी चालत जात असताना पाठिमागून आलेल्या चोरट्यांनी तरुणाच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावला होता. तरुणाने प्रतिकार केल्यानंतर या चोरट्यांनी तरुणाच्या हाताला धरून सुसाट दुचाकीवरून त्या तरुणाला २०० ते ३०० फुट फरफटत नेले होते. त्यानंतर त्याचा हात सोडून चोरटे पसार झाले होते. या गुन्ह्याचा तपास तपास पथक करत होते.
सहाय्यक निरीक्षक सचिन कुदळे व कर्मचाऱ्यांनी या भागातील जवळपास १०० हून अधिक सीसीटीव्ही तपासले. त्यात संशयित दिसून आले होते. त्यानंतर पुढील सीसीटीव्ही तपासून तिघांची ओळख पटवली. यानंतर या तिघांना पकडण्यात आले. तिघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. तसेच,चोरून नेलाला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.