दुचाकी आणि इको कारची समोरासमोर धडक; विशीतल्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत, गावावर शोककळ
योगेश पांडे/वार्ताहर
पालघर – डहाणू तालुक्यातील कासा- सायवन मार्गावररून राहुल हरके (२०), चिन्मय चौरे (१९) आणि मुकेश वावरे (२०) हे तीन तरुण एकाच दुचाकीवरून ट्रिपल सीट स्वार होऊन निघाले होते. त्यांच्या भरधाव दुचाकीने वाघाडी येथील गेल इंडिया कंपनीनजीक समोरून येणाऱ्या एका इको कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, इको कार जागीच उलटली. अपघातात दुचाकीचा देखील चक्काचूर झाला आहे. भीषण अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली. तातडीने स्थानिकांनी अपघातग्रस्तांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्यांना तपासून तरुणांना मृत झाल्याचे घोषित केले. दुचाकी आणि इको कारच्या या भीषण अपघातात राहुल हरके,चिन्मय चौरे आणि मुकेश वावरे या तिघांच्या डोक्याला व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील मृत तीनही तरुण डहाणू तालुक्यातील कासा चारोटी परिसरातील रहिवासी आहेत. अपघातात इको कार मधून प्रवास करणारी एक महिला जखमी झाली असून रीना मोरे असे जखमी महिलेचे नाव आहे. महिलेला उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. याप्रकरणी कासा पोलीस अधिक तपास करीत आहेत.