पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये ८ व ९ वर्षांच्या बहिणींची हत्या; मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये लपवले. पोलिसांनी आरोपी आचाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे : कल्याण पूर्वमध्ये एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या घटनेनं शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असताना आता दोन चिमुकल्या बहिणींच्या हत्येनं पुणे हादरलं आहे. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये ८ आणि ९ वर्षांच्या सख्ख्या बहिणींची हत्या केली आहे. आरोपीने मुलीचे मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये लपवून ठेवले होते. याप्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर आरोपीच्या देखील मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून पीडित मुलींच्या शेजारी राहणारा एक आचारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी १ वाजता दोन्ही मुली राहत्या घराच्या अंगणात खेळत होत्या. खेळता खेळता त्या अचानक गायब झाल्या. यानंतर घाबरलेल्या मुलीच्या घरच्यांनी दोघींचा विविध ठिकाणी शोध घेतला, पण त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. यानंतर सायंकाळी ५ वाजता मुलींच्या नातेवाईकांची पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तातडीनं तपास सुरु केला. घराच्या आसपासचा परिसर पालथा घालत मुलींचा शोध घेतला. पण पोलिसांच्या हातीही काहीच लागलं नाही.
यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी मुली राहत असलेल्या घराची आणि घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीची तपासणी केली. यावेळी वरच्या मजल्यावरील खोलीत असलेल्या पाण्याच्या ड्रम दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. दोन्ही मुलींचे पाय वर आणि डोकं खाली असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. या घरात एक आचारी राहत होता. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी आचाऱ्याच्या मुसक्या आवळल्या. प्राथमिक तपासानुसार, आरोपी आचाऱ्याने पीडित मुलींना गोड बोलून वरच्या मजल्यावर बोलावलं होतं. तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिने विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आता आपलं बिंग फुटेल या भीतीने आरोपीनं एका बहिणीचा जीव घेतला आणि त्यानंतर घाबरलेल्या आचाऱ्याने दुसरी बहिणीचा देखील तसाच जीव घेतला. दोघींची हत्या केल्यानंतर आरोपीनं मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमरातीजवळील ड्रममध्ये मृतदेह ठेवले. राजगुरूनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता, या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी आचाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्यात. तर बहिणींची मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात आहेत, या अहवालातून नेमकं काय-काय घडलं हे स्पष्ट होईल. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.