धुळ्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशींना अटक; कल्याण, उल्हासनगरसह भिवंडीत मोठी कारवाई
योगेश पांडे/वार्ताहर
भिवंडी – धुळे शहरातील हॉटेल न्यू शेरे पंजाब येथून आज चार बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि एटीएसच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यामुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली असतांना अशीच एक मोठी कारवाई सोमवारी ठाणे जिल्ह्यात देखील करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरात बेकायदा वास्तव्य करत असलेल्या २५ बांगलादेशी नागरिकांना डोंबिवली मानपाडा आणि भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्याचे कोणतेही अधिकृत कागदपत्रे आढळून आले नाहीत. याप्रकरणी मानपाडा पोलीस आणि भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत २५ बांगलादेशी नागरीकांना अटक केली आहे. मानपाडा पोलिसांना बांगलादेशी नागरिक राहत असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी या माहितीची खात्री केल्यावर त्यांना सात बांगलादेशी राहत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या सात बांगलादेशींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठीचे पत्र, व्हिसा आणि नागरिकत्व कागदपत्रांची मागणी केली असता पोलिसांना ते एकही कागदपत्र देऊ शकले नाहीत. बिसू शेख, रुमान पोकीर, दिलावर हुसेन, आरीफ मुल्ला, आरीफ मोफिजून, एक अज्ञात महिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कल्याण पूर्वेत विठ्ठलवाडी भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी पती, पत्नीला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ते मागील सात वर्षापासून कल्याणमध्ये राहत होते. पती एका वाहनावर चालक, तर पत्नी एका बार मध्ये बारगर्ल म्हणून काम करत होती. भिवंडीत हनुमान टेकडी परिसरातून ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि भिवंडी पोलिसांनी कारवाई करून १८ घुसखोर बांगलादेशी महिला पुरुषांना अटक केली आहे. अटक १८ बांगलादेशी महिला ह्या सेक्स वर्कर चा व्यवसाय करीत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तसेच इतर काही पुरुष वेगवेगळे काम करत होते. तर ठाणे जिल्ह्यात एकूण २५ बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. या सगळ्या कारवाई वरून ठाणे जिल्ह्यातील पोलीस एक्शन मोडवर असल्याचे पाहायला मिळाले असून अधिक तपास पोलीस करत आहे.